माळशेज घाटात धबधब्यात अडकले पर्यटक; १५ पर्यटकांना महामार्ग पोलिसांनी काढले बाहेर

रविवार, २३ जून रोजी विकेंड वर्षा सहलीसाठी माळशेज घाटातील धबधब्याच्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी अनेक पर्यटक आले होते.
माळशेज घाटात धबधब्यात अडकले पर्यटक; १५ पर्यटकांना महामार्ग पोलिसांनी काढले बाहेर

मुरबाड : माळशेज घाटात सद्या बऱ्यापैकी पाऊस पडत असल्याने वर्षा सहलीसाठी पर्यटकांचा ओढा लागला आहे; मात्र दरवर्षीप्रमाणे पर्यटनावर दरडीचे सावट असताना आता धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढू लागल्याने पर्यटक अडकून पडण्याची घटना घडली आहे. माळशेज महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे जवळपास १५ पर्यटकांना सुखरूप बाहेर काढल्याने महामार्ग पोलिसांच्या दक्ष कामगिरीचे कौतुक होत आहे.

रविवार, २३ जून रोजी विकेंड वर्षा सहलीसाठी माळशेज घाटातील धबधब्याच्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी अनेक पर्यटक आले होते. एका पॉइंटजवळील धबधब्या खाली जवळपास १५ पर्यटक आंघोळ करीत होते. त्यात १ वर्षांचा लहान मुलगा व २ लहान मुले ही आंघोळीचा आनंद लुटत होते; मात्र धबधब्याच्या पाण्याचा डोंगरावरून अचानक प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढल्याने ते पर्यटक प्रचंड घाबरले व काही अघटीत होण्याची शक्यता निर्माण झाली होती; मात्र याच वेळी उमरोली माळशेज महामार्ग पोलीस या भागात पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी ते दृश्य पाहून अडकलेल्या त्या पर्यटकांना पाण्याच्या प्रवाहाच्या बाजूने एक एक करून सुखरूप पने सुरक्षित स्थळी आणून सोडले. या दक्ष कामगिरीत माळशेज महामार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल विसपुते, पोलीस शिपाई भोई, पो. शि. जाधव, पो. शि. कोकाटे यांनी सहभाग घेतला.

logo
marathi.freepressjournal.in