उल्हासनगरात टोइंग व्हॅनचालकाचा मुजोरीचा कळस ; दोघांना फरफटत नेले, रिक्षाचालक गंभीर जखमी

नागरिक व व्यापाऱ्यांनी टोइंगची गाडीच बंद करण्याची मागणी केली आहे.
उल्हासनगरात टोइंग व्हॅनचालकाचा मुजोरीचा कळस ; दोघांना फरफटत नेले, रिक्षाचालक गंभीर जखमी

उल्हासनगर : टोइंग व्हॅनने व्यक्तीच्या समोरच उभी असलेली दुचाकी उचलल्यावर सुसाट निघालेल्या व्हॅनचालकाने व्यक्तीसोबत रिक्षाचालकाला फरफटत नेल्याची संतापजनक मंगळवारी दुपारी उल्हासनगरात घडली आहे. यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून टोइंग मुजोरीच्या विरोधात एकवटलेल्या नागरिक व व्यापाऱ्यांनी टोइंगची गाडीच बंद करण्याची मागणी केली आहे.

औषध आणण्यासाठी गेलेल्या गौतम दादलानी याने आपली गाडी ही रस्त्यावर पार्क केली होती. तेव्हा टोइंग व्हॅन तिथे आली आणि त्यांनी गौतम यांची गाडी उचलली. तेव्हा गौतम तिथे आला आणि त्याने गाडी का उचलली? असे विचारले तेव्हा टोइंगमध्ये काम करणाऱ्या मुलांनी त्याला शिवीगाळ करून गाडी टोइंगमध्ये टाकली. त्यानंतर गौतमने टोइंगची गाडी अडवली. त्यानंतर टोइंगच्या गाडीत बसलेल्या महिला ट्राफिक पोलीसला त्याने शिवीगाळ केल्याचा जाब विचारला. तेव्हा शिवीगाळ करणाऱ्या मुलांनी खाली उतरून गौतमला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी टोइंग गाडीच्या ड्रायव्हरने कसलाही विचार न करता गाडी चालवण्यास सुरुवात केली. तेव्हा गाडी पकडून ठेवणाऱ्या गौतम दादलानी आणि बाजूला उभ्या असलेला रिक्षाचालक राकेश तिवारी याला फरफटत नेले. अंगावरचे कपडे फाटल्याने तिवारी जखमी अवस्थेत बाजूला पडला, तर गौतमला फरफटत नेले. नागरिकांनी धाव घेत टोइंग थांबवल्यावर चालक पळून गेला. जखमी गौतमला बालाजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर रिक्षाचालक तिवारी याला उपचारासाठी मध्यवर्ती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

संबंधितांवर कारवाईची मागणी व्यापारी नेत्यांनी केली असून ही टोइंगच बंद करण्याचा सूर नागरिकांत उमटू लागला आहे.

logo
marathi.freepressjournal.in