नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी; एका बाजूची वाहतूक सुरू नसल्याने वाहनचालक त्रस्त

मुंबई-नाशिक आणि भिवंडी-कल्याण या मार्गावर वाहतूक पोलिसांचे नियोजन कमी आणि सुरू असलेल्या अरेरावीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी; एका बाजूची वाहतूक सुरू नसल्याने वाहनचालक त्रस्त
Published on

भिवंडी : मुंबई-नाशिक आणि भिवंडी-कल्याण या मार्गावर वाहतूक पोलिसांचे नियोजन कमी आणि सुरू असलेल्या अरेरावीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सतत होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे वाहनचालक, प्रवासी आणि नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत वाहतूक पोलीस वाहनचालकांना शिस्त नसल्याचा आरोप करून नामानिराळे राहत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

मुंबई-नाशिक महामार्ग भिवंडीच्या ग्रामीण भागातून जात आहे. ठाण्याच्या खारेगाव खाडीपुलानंतर भिवंडी हद्द सुरू होते. या मार्गावर सध्या रस्ता रुंदीकरण आणि त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून या मार्गावर नियमित वाहतूककोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. या मार्गाचे काम प्रगतिपथावर असताना काही रस्ते पूर्ण झाले आहेत. असे असताना माणकोली नाका येथे नारपोली वाहतूक विभागाचे पोलीस एकेक तास वाहतूक रोखून धरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वास्तविक रस्त्याच्या डाव्या बाजूने ठाण्याकडे जाण्यासाठी वाहतुकीस कोणताही अडथळा नसताना ठाण्यास जाणाऱ्या वाहनचालकांना आणि बसेसना मार्ग काढून दिल्यास वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होते. याकडे नारपोली वाहतूक विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे अंजूरफाट्याकडे जाणाऱ्या वाहनांबरोबर ठाणे-मुंबईच्या वाहनचालकांना देखील ताटकळत वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो.

माणकोली या ठिकाणी ठाणे-मुंबईकडे जाण्यासाठी उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. तरी प्रवासी बसेस आणि छोटी वाहने उड्डाणपुलाखालूनच ठाण्यात जाणे पसंत करतात. त्यांना रस्त्याच्या डाव्या बाजूने जाण्याचा मार्ग खुला करण्याची मागणी केली जात आहे, जणेकरून वाहतूकोंडीतून प्रवाशांची सुटका होईल. त्याचप्रमाणे या महामार्गावरील रांजणोली नाका येथे सर्व मार्गावरून डाव्या बाजूने वाहनांना जाण्यासाठी कोणताही अडथळा नसतो. तरी देखील सरळ मार्गाने जाणाऱ्या वाहनांबरोबर या वाहनांना जाणीवपूर्वक अडविले जाते. या चौकात कोनगाव वाहतूक पोलीस चौकी आहे. मात्र या ठिकाणी सिग्नल बसविलेले नाही.

कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल

या चौकात येणाऱ्या वाहनांना डाव्या बाजूने नाशिक, कल्याण, ठाणे आणि भिवंडी मार्गे सोडल्यास आपोआप वाहतूककोंडी सुटण्यास मदत होऊन नागरिकांचा वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर डाव्या बाजूने न जाणाऱ्या वाहनांवर कारवाई केल्यास त्या वाहनचालकांना देखील शिस्त लागेल. याबाबत पोलिसांना जाब विचारण्यास गेले असता कर्मचारी कमी असल्याची माहिती मिळते. तर रविवार रोजी नारपोली वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

logo
marathi.freepressjournal.in