

भाईंंदर : मीरा-भाईंदर शहरातील ठाणे-घोडबंदर राज्य महामार्गासह विविध प्रमुख रस्त्यांवर पावसाळ्यात निर्माण झालेल्या गंभीर समस्यांची दखल घेत काशिमीरा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश शिवरकर यांनी मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचणे, खोल खड्डे पडणे, वाहतूककोंडी होणे तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणे, या पार्श्वभूमीवर २७ जुलै रोजी ही नोटीस जारी करण्यात आली आहे. नोटिशीत संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अपघातांची शक्यता वाढल्याचा ठपका ठेवत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नोटिशीनुसार, ठाणे-घोडबंदर राज्य महामार्गावरील चेनागाव ते वरसावे वाहिनीवरील करपे कंपाऊंड परिसरात पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. तसेच काजूपाडा ते निरा केंद्र दरम्यान भार्गव गॅरेज परिसरात अपुऱ्या जलनिस्सारण व्यवस्थेमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय एस. के. स्टोन नाका, काशिमीरा, काजूपाडा, चेनागाव तसेच इंडियन ऑईल पेट्रोल पंप ते करपे कंपाऊंड या मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. धोकादायक झाडांच्या फांद्या तातडीने छाटणे, मॅनहोल व गटारांची झाकणे सुरक्षितपणे बंद ठेवणे तसेच सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही नोटिशीत देण्यात आल्या आहेत.
नोटिशीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित विभागाने पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना केल्या असत्या तर पाणी साचणे, वाहतूककोंडी आणि अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता आला असता. संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा आणि बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, भविष्यात या कारणांमुळे कोणताही अपघात अथवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते, असा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे.
प्रशासनाच्या जबाबदारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
काशिमीरा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश शिवरकर यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून ही नोटीस जारी केली असून, तिची प्रत मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, ठाणे वनविभाग, पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त तसेच संबंधित पोलीस ठाण्यांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.
कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी
रस्ते व इतर विकासकामे संथगतीने सुरू असल्याने शालेय बस, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांची वाहने तासन् तास वाहतूककोंडीत अडकत असल्याची गंभीर बाबही सहाय्यक पोलीस आयुक्तांनी निदर्शनास आणून दिली आहे. तसेच जुना टोल नाका परिसरात डोंगरमाथ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर येत असल्याने वाहन अपघाताचा धोका निर्माण होत असून, त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.