भिवंडीत सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहतूककोंडी कायम: प्रवाशांचे हाल; प्रदूषणात होतेय वाढ

भिवंडी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याबाबत महापालिका प्रशासन व वाहतूक पोलीस प्रशासन यांच्यात कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्याने वाहनचालक, प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांना शहर आणि परिसरातील वाहतूककोंडीचा फटका बसत आहे. त्याचबरोबर या परिसरातील प्रदूषणात वाढ होत आहे.
भिवंडीत सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहतूककोंडी कायम: प्रवाशांचे हाल; प्रदूषणात होतेय वाढ
Published on

सुमित घरत / भिवंडी

भिवंडी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याबाबत महापालिका प्रशासन व वाहतूक पोलीस प्रशासन यांच्यात कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्याने वाहनचालक, प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांना शहर आणि परिसरातील वाहतूककोंडीचा फटका बसत आहे. त्याचबरोबर या परिसरातील प्रदूषणात वाढ होत आहे. शहरातील उड्डाणपुलावर नियमित वाहतूक सुरू असताना पुलाखालील वाहतूक सुरळीत करण्यासाठी म्हणून दोन वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनाने मुख्य रहदारीच्या मार्गावर लाखो रुपये खर्च करून सिग्नल यंत्रणा विविध चौकात उभी केली. मात्र वाहतूक पोलीस नियंत्रण शाखा व महापालिका प्रशासन यांच्यामध्ये ती यंत्रणा चालविण्यासाठी समन्वय नसल्याने ही यंत्रणा अद्याप बंद अवस्थेत आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही सिग्नल यंत्रणा फक्त शोभेचे बाहुले ठरलेली आहे.

मुंबई-नाशिक व मुंबई-वाडा या शहरातून जाणाऱ्या जुना आग्रा रोड मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहतूक पोलिसांवर प्रचंड ताण पडतो आणि वाहतूककोंडी सोडवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. भिवंडी शहरातील स्व. आनंद दिघे चौक, जुना जकात नाका, वंजारपट्टी नाका, स्व. राजीव गांधी चौक, कल्याण नाका व भादवड नाका या ठिकाणी महापालिकेने सिग्नल यंत्रणा बसविली आहे. त्यापैकी वंजारपट्टी येथील सिग्नल यंत्रणा एमएमआरडीएकडून बसविण्यात आली, तर स्व. आनंद दिघे चौक या ठिकाणी १४ लाख ३० हजार, स्व. राजीव गांधी चौक येथे ९ लाख ३९ हजार, तर भादवड येथे ७ लाख २५ हजार रुपये खर्च करून मनपाने तीन ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभी केली आहे. महापालिकेने यासाठी ३० लाख ९४ हजार रुपये खर्च केले. परंतु प्रत्येक ठिकाणची सिग्नल यंत्रणा फक्त उद्घाटन दिवशी सुरू झालेली असते. त्यानंतर काही दिवसांत ही सिग्नल यंत्रणा बंद होते. गेल्या वीस ते तीस वर्षांत महानगरपालिकेने वाहतूक पोलिसांच्या मागणीनुसार अशा प्रकारची सिग्नल यंत्रणा चार वेळा उभारली आहे. मात्र या यंत्रणा कालांतराने बंद होऊन या यंत्रणेला भंगाराचे स्वरूप येते. याप्रकरणी पालिका प्रशासन व वाहतूक पोलीस शाखा यांच्याकडे अनेकदा नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रशासकीय पातळीवर प्रत्येकाने आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलल्याने ही समस्या दूर होण्याऐवजी दिवसेंदिवस वाहतूककोंडीचा त्रास वाढत आहे.

शहरातील नदीनाका ते अंजूरफाटा आणि कल्याणरोड ते मुंबई-नाशिक बायपास मार्ग या दरम्यान अनेकदा वाहतूककोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकलेल्या दिसून येतात. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाढलेली वाहने आणि यंत्रमाग कारखान्यांच्या व्यवसायातील वाहनांचा ताण शहरातील रस्त्यांवर आणि वाहतूक पोलिसांवर असताना शहरात अवजड वाहने मोठ्या संख्येने येत असल्याने होणाऱ्या वाहतूककोंडीत भर पडत आहे. यापूर्वी अवजड वाहनांची वाहतूक परस्पर शहरातील उड्डाणपुलावरून होत असल्याने शहरातील वाहतुकीवर त्याचा परिणाम होत नव्हता. परंतु महानगरपालिकेने अवजड वाहनांना उड्डाणपुलावरून जाण्यासाठी बंदी केल्याने ही सर्व वाहने या उड्डाणपुलाखालून जात असल्याने शहरातील वाहतुकीवर त्याचा परिणाम होत आहे.

भिवंडी शहरातील मुख्य मार्ग असो की अंतर्गत मार्ग असो सर्व ठिकाणी अरुंद रस्ते आहेत. त्यामुळे हे सिग्नल सुरू केल्यास थांबलेल्या गाडीमागे वाहनांची रांग वाढते. त्यामुळे रस्ते रुंद केल्यास डाव्या बाजूच्या वाहनांना नियमित जाण्याचा मार्ग उपलब्ध होऊन वाहतूककोंडी सुटू शकते.

- सुधाकर खोत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भिवंडी शहर वाहतूक शाखा

logo
marathi.freepressjournal.in