राम मंदिरासाठी न बोलावल्यामुळे आदिवासी बांधव राष्ट्रपतींची भेट घेऊन खंत व्यक्त करणार

प्रजासत्ताक दिनी आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी हातात संविधानाच्या प्रती घेऊन मूक निदर्शने केली.
राम मंदिरासाठी न बोलावल्यामुळे आदिवासी बांधव राष्ट्रपतींची भेट घेऊन खंत व्यक्त करणार

ठाणे : नुकताच अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण झाले. या लोकार्पण सोहळ्यास अनेक राजकीय पुढारी, अभिनेते यांना बोलावण्यात आले. मात्र, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी असल्यानेच त्यांना बोलावण्यात आले नाही. याबाबत महाराष्ट्रातील आदिवासी बांधव राष्ट्रपतींची भेट घेऊन खंत व्यक्त करणार आहेत, अशी माहिती आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांनी दिली.

२२ जानेवारी रोजी आयोध्येत रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापीत करण्यात आली. या सोहळ्यास अनेकांना आमंत्रणे देण्यात आली होती. अनेकांकडून हे आमंत्रण फेटाळण्यात आले होते. मात्र, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले नाही. त्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनी आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी हातात संविधानाच्या प्रती घेऊन मूक निदर्शने केली.

यावेळेस अनिल भांगले यांनी, प्रभू रामाने वनवासात शबरी या आदिवासी महिलेची उष्टी बोरे खाल्ली. मात्र, इथे आदिवासी असल्यानेच राष्ट्रपतींना बोलावण्यात आले नाही. या आधीही संसदेच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यातही त्यांना बोलावण्यात आले नव्हते. एकीकडे उत्तर प्रदेशचे प्रथम नागरिक म्हणून तेथील राज्यपालांना बोलावण्यात येते. मात्र, देशाच्या प्रथम नागरिकास बोलावण्यात येत नाही. हा कार्यक्रम जरी रामजन्मभूमी न्यासाने आयोजित केला असला तरी त्यावर प्रधानमंत्री कार्यालयाचा अंकुश होता. म्हणजेच जाणीवपूर्वक द्रौपदी मुर्मू यांना बोलावण्यात आले नाही. हा फक्त आदिवासींचा अपमान नसून देशाचा अपमान आहे, असा आरोप करून आपण आदिवासींचे शिष्टमंडळ घेऊन राष्ट्रपतींची भेट घेऊन खंत व्यक्त करणार आहोत, असे सांगितले.

या आंदोलनात आदिवासी क्रांती सेनेच्या मुलुंड महिलाध्यक्षा गीता भांगरे, उप तालुकाध्यक्षा सुनिता डोगडे, ठाणे शहराध्यक्षा नताशा सोनकर, सुनिता सुपे, यशोदा गंवादे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in