आदिवासी दुहेरी संकटात,एकीकडे पेरणीचे संकट तर दुसरीकडे पाणी टंचाईची समस्या

दरवेळी फेब्रुवारी महिन्यात पाणी टंचाईची समस्या तोंड वर काढते.
आदिवासी दुहेरी संकटात,एकीकडे पेरणीचे संकट तर दुसरीकडे पाणी टंचाईची समस्या

अतिदुर्गम डोंगराळ असलेल्या मोखाडा तालुक्यातील आदिवासींना दरवर्षीच पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो. यंदा जून महिना सरत आला असतानाही पाणी टंचाई पिच्छा सोडायला तयार नाही. पावसाने लांब दडी मारल्याने येथील आदिवासी अडचणीत सापडला आहे. एकीकडे पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले असताना दुसरीकडे पाणी टंचाईचे भूत देखील मानगुटीवर बसल्याने येथील आदिवासी दुहेरी संकटात सापडला आहे.

दरवेळी फेब्रुवारी महिन्यात पाणी टंचाईची समस्या तोंड वर काढते. तालुक्यात खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोठी मोठी धरणे उशाला असून देखिल घशाला मात्र कोरड अशी परिस्थिती आहे. वर्षानुवर्षे मोखाडा वासियांना भेडसावणारा पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न लोकप्रतिनिधी प्रशासन सोडवणार तरी कधी ? असा उदीग्न सवाल यावेळी आदिवासी बांधवांकडून विचारला जातआहे. आज घडीला मोखाडयांतील ६८ गावपाड्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून १८ गावे व ५० पाड्यांना २० टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.

मध्य वैतरणा प्रकल्पातून १२० कि.मी. अंतरावर मुबंईला शासनाने पाणी पोहचवले आहे, मात्र धरणालगतच्या ४ ते ५ किमी अंतरावरच्या गावांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. तालुक्यातील धामणशेत, चास ,अश्या अनेक ठिकाणांच्या नळपाणी पुरवठा योजनेवर करोडोचा खर्च होऊनदेखील त्या बासनात गुंडाळल्याचे चित्र आहे.

मागील काही वर्षात ग्रामपंचायत, ठक्कर बाप्पा योजना, लघु पाटबंधारे, नळपाणी पुरवठा आदी विभागांच्या माध्यमातून तसेच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधारे, विहीरी मधील गाळ काढणे, शेततळे बांधणे, लघु पाटबंधारे, वन विभागाचे बंधारे, नळपाणी पुरवठा योजना, सिंचन विहीरी,आदी सह सेवाभावी संस्थानी बांधलेले बंधारे या कामावर कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला. त्याचबरोबर बर्याच ठिकाणी पाणी अडवण्यासाठी भुमिगत बंधारे तयार करण्यात आले, मात्र याचा फायदा नेमका किती झाला? याचे उत्तर आज ही प्रशासनाकडे नाही, यामुळे दरवर्षीच पाणी टंचाईच्या नावाखाली लाखो रुपये खर्चून टँकर लॉबीला जगवले जात असल्याची भावना स्थानिक नागरिकामंध्ये निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू होण्याआधीच या भागात पाणीटंचाईला सुरूवात होते. यासाठी मैलोमैल पाण्यासाठी वणवण फिरावे लागते मात्र याकडे आजपर्यंत प्रशासनाने गांभीर्याने पाहिल्याचे दिसत नाही. पाणी टंचाईच्या काळात टॅंकरची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते त्यात खेड्यापाडयांमध्ये टॅंकरकडून मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होत असतो मात्र प्रशासनाचे पाणी काही नळापर्यंत पोहोचत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in