होळी सण मोठा, पण हातात केव्हा पडतील नोटा? मनरेगा योजनेतील आदिवासी मजुरांचा उद्विग्न सवाल; ३५ कोटींची मजुरी शासनदरबारी थकित

आदिवासींचा सर्वात मोठा सण होळी आहे. हा सण आदिवासी बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. या सणाला गुळ, खोबरे, रवा, मैदा, साखरेच्या हलव्याचे दागिने आणि कोंबडीचा बेत आदिवासी बांधव करत असतात.

दीपक गायकवाड/ मोखाडा

आदिवासींचा सर्वात मोठा सण होळी आहे. हा सण आदिवासी बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. या सणाला गुळ, खोबरे, रवा, मैदा, साखरेच्या हलव्याचे दागिने आणि कोंबडीचा बेत आदिवासी बांधव करत असतात. नवे कपडे खरेदी करतात. हा सण व्यापाऱ्यांसाठी पर्वणीच असतो. त्यामुळे व्यापारी या सणाला खूप माल आणतात, मात्र या वर्षी जिल्ह्यात मनरेगाची मोठ्या प्रमाणात कामे झाली असली तरी तसेच मजुरांना केलेल्या कामाची मजुरी मिळालेली नाही. त्यामुळे होळीच्या सणावर मंदीचे सावट निर्माण झाले आहे. आजमितीस जिल्ह्यातील ५५ हजार मजुरांची ३५ कोटी रुपयांची मजुरी शासनदरबारी थकीत आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने होळी सण मोठा असला तरी हातात केव्हा पडतील नोटा? असा उद्विग्न सवाल जिल्ह्यातील मजुरांना भेडसावत आहे.

होळीचा सण जसजसा जवळ येत आहे, त्याचप्रमाणे बाजारपेठ देखील सजत आहेत. व्यापारी दुकान थाटून बसले असले तरी स्थानिक गिऱ्हाईकांवरच त्यांची रोजीरोटी असल्यामुळे व्यापारी ग्राहकांची प्रतीक्षा करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दुसरीकडे मजूर देखील आपल्या घामाचा मोबदला मिळण्याची वाट बघत आहे. मालाच्या विक्रीच्या चिंतेत व्यापारी तर सण साजरा करण्यासाठी मजुरी मिळवण्याच्या प्रतीक्षेत एकूणच मजूर असे चित्र आहे.

शिमग्याच्या आनंदावर विरजण

आदिवासी भागातील होळीच्या सणाला खूप महत्व आहे. स्थलांतरित झालेला मजूरवर्ग कुठेही असलातरी, हा सण साजरा करण्यासाठी गावाकडे परतत असतो. या सणाला गुळ, खोबरे, रवा, मैदा, साखर या वस्तूंच्या गोड मेनू बरोबरच कोंबडीचाही बेत आखला जातो. तसेच आपल्या मुलाबाळांसह, स्वतःलाही ही नवीन कपडे खरेदी केली जातात. त्यामुळे या सणासाठी व्यापारी अक्षरशः उधारी उसनवारी करून खूप माल आणतात. मात्र, या वर्षी स्थानिक ठिकाणी मजुरांना पगाराची वाणवा असल्याने, यंदाच्या शिमग्याच्या आनंदावर विरजण पडते की काय? अशी दुग्ध्यातली परिस्थिती जिल्ह्यातील मजुरांसह एकूणच व्यापारी वर्गाच्या समोर आ-वासून उभी राहिली आहे.

व्यापारी चिंतेत

पूर्वी होळीच्या सणाला बाजारपेठेत आठ दिवस, खरेदी-विक्रीसाठी मोठी वर्दळ असायची. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून या सणाला ओहोटी लागली आहे. क्रिकेटच्या वनडे मॅचप्रमाणे, बाजारपेठेत ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होते. त्यामुळे व्यापारी माल आणून धास्तावले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात माहे मार्चमधील मनरेगाच्या ५५ हजार मजुरांची ३५ कोटी रुपये मजुरी शासनदरबारी थकली आहे. ग्रामपंचायत आणि विविध नरेगाच्या यंत्रणांकडे हजारो आदिवासी मजुरांनी कामे केली आहेत. मात्र, त्याची मजुरी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे आपला सर्वात मोठा सण साजरा करायचा कसा? या चिंतेत आदिवासी पडला आहे. सद्यस्थितीत व्यापारी दुकाने थाटण्याच्या तयारीत खरेदी करून बसले आहेत, मात्र मजुरांच्या हातात पैसा आल्याशिवाय धंदा होणार नसल्याने व्यापाऱ्यांना सद्यातरी गणपत वाण्यासारखे मनातच ईमले बांधावे लागणार आहेत

logo
marathi.freepressjournal.in