
तालुक्यातील मौजे न्याहाळे तळ्याचापाडा येथील रहिवासी असलेल्या आणि पालकांचे छत्र हरपलेल्या दोन अनाथ मुले सचिन गोविंद व कामिनी गोविंद ही भावंडे एका झोपडीत राहत आहेत. ते कसेबसे आपला उदरनिर्वाह करतात. त्याच गावातील एक सुशिक्षित युवक संतोष गोविंद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांच्या मदतीसाठी आवाहन करीत साद घातली, सादेला प्रतिसाद देत आदिवासी क्रांती दलाचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटकर यांनी आपल्या संघटनेच्या सहकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी पोहोचून मदतीचा हात दिला,पालक दगावले असताना अनेक हात मदतीला सरसावले.
या मुलांना जीवनावश्यक वस्तू कपडे, चप्पल, शैक्षणिक साहित्य, दोन महिने पुरेल इतके किराणा सामान सामाजिक जाणिवेतून उपलब्ध करून दिले. सचिन हा इयत्ता ७ वीत शासकीय आश्रमशाळा न्याहाळे येथे शिक्षण घेत असून तो घरून ये-जा करतो तर,
कामिनी ही जिल्हा परिषद शाळेत ५ वीत शिक्षण घेते. याबाबत तात्काळ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार सहायक प्रकल्प अधिकारी विजय मोरे आणि सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) सुभाष परदेशी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्या मुलांचे शासकीय आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा न्याहाळे येथे शालेय प्रवेश व वसतिगृहात राहण्याची योग्य व्यवस्था करून मदतीचा हात दिला. याकामी शाळेचे मुख्याध्यापक वसंत मस्के, अधीक्षक शिंपी, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कांबळे यांचे सहकार्य लाभले. यावेळी युवा जिल्हा अध्यक्ष भूषण महाले, युवा जिल्हा उपाध्यक्ष महेश भोये, जिल्हा सल्लागार दामू मौळे, मिलिंद बरफ, दीपक गावंढा आदी पदाधिकारी उपस्थित होते.