गौरी पूजनासाठी आदिवासी सुवासिनींची लगबग; ढोल, तारपा नृत्य करण्याची परंपरा

गौरी वेल, दिंड्याचे पान, तेरडा, नारोडा, करडू, टाकला, कचोऱ्याचा झाड, गायगोजीचा ताना, करटोलीचा ताना, सिंदीचा फूल, कांदाचा ताना, गोहिल्याचा ताना, गोमेठीचा ताना अशी रानफुलांची आरास सजवून गौरी नाच, गौरी गीतांचा जागर करून आदिवासी पाड्यांत पारंपरिक पद्धतीने गवूर पूजन केले जाते.
गौरी पूजनासाठी आदिवासी सुवासिनींची लगबग; ढोल, तारपा नृत्य करण्याची परंपरा
Published on

नितीन बोंबाडे/पालघर

गौरी वेल, दिंड्याचे पान, तेरडा, नारोडा, करडू, टाकला, कचोऱ्याचा झाड, गायगोजीचा ताना, करटोलीचा ताना, सिंदीचा फूल, कांदाचा ताना, गोहिल्याचा ताना, गोमेठीचा ताना अशी रानफुलांची आरास सजवून गौरी नाच, गौरी गीतांचा जागर करून आदिवासी पाड्यांत पारंपरिक पद्धतीने गवूर पूजन केले जाते. शेतीची कामे संपल्याने शेतकरी वर्गातील सुवासिनींची सध्या गवूर सणासाठी लगबग पाहायला मिळत आहे. गौरीच्या आगमनापूर्वी पंधरा दिवस ते एक महिना आधीपासून तरुण, तरुणी रात्री घरोघरी गवूर गीतांवर नाचून जागर करतात. रात्री उशिरापर्यंत गवरी गीतांवर आधारित खास गवरी नाच, ढोल नाच, तारपा नाच करण्याची परंपरा आहे.

शेतातली लक्ष्मी फळण्यासाठी शेतकरी वर्गात देवीला गाऱ्हाणे घालून पारंपरिक रूढीपरंपरा जपत गवूर मातेचे पूजन केले जात आहे. गौरी पूजनाच्या एक दिवस आधी गवूर घराच्या बाहेर आणून ठेवली जाते. गौरी आणणाऱ्या व्यक्तीच्य‍ा कानात सुवासीन फूल अडकवते. प्रत्येक ठिक‍ाणी त्याची वेगवेगळी परंपरा जपली जाते.

पानाफुलांपासूनच गौराय मातेच्या देवीची आरास केली जाते. त्याभोवती नऊवारी साडी नेसवून मातेला सजवण्यात येते. प्रत्येक समाजात गौरी पूजनाची वेगवेगळी प्रथा परंपरा असली तरी गवूर पूजन‍ात रानफुलांचे महत्त्व अबाधित आहे. गवूर पूजनाच्या दिवशी रानफुलांपासून विशिष्ट आकारात चुलीजवळ, तर काही ठिकाणी पाट, खुर्ची अथवा बाकावर बसवून रानफुलांनी देवीची प्रतिकृती बनवली जाते. गौराय देवीला नाकाची नथ, मंगळसूत्र, बांगड्या आणि दागिने यांनी सजविले जाते. जंगल‍ात, माळात फिरून रानफुले गोळा करून त्याच्या विक्रीतून गौरी सणानिमित्त आदिवासी महिला, पुरुषांच्या हाताला लक्ष्मी लाभत आहे.

आदिवासी गौरी पूजन

इंदई या वनस्पतीला गवराय मातेचे पवित्र रूप मानून पूजन केले जाते. सोबतच डिनेचे पान, पेवा, ठेरडा, टाकला, गोमेठी, गयगव्हाऱ्या, कोलांद, कांद या औषधी वनस्पतींचेही पूजन केले जाते. त्या अगोदर लाल मातीच्या सहाय्याने घरासमोरील पायरीवरून सुरुवात करून मयतूर मेढ, उखळ, दारकस ते चुलीपर्यंत पट्टे आखून घेतले जातात. त्यानंतर वनस्पतींचे स्वागत करून सुपात विराजमान केले जाते. हाताच्या सहाय्याने आखलेल्या पट्ट्यावर गवराय मातेची पावले उमटवली जातात. याच दिवशी घराचे कारवींचे कुड लाल मातीने सारवून घेतले जातात. त्यावर आदिवासी देव-देवतांची चित्रे रेखाटली जातात. गवराय मातेच्या आगमनाने आनंदी होऊन गवरी गीत गाऊन व नाचून उत्सव साजरा केला जातो. आदिवासी समाजात वारली गवूर बसवली जात नाही.

logo
marathi.freepressjournal.in