काशीमिरात ट्रक क्लीनरचा गटारात पडून मृत्यू

ट्रकचा टायर गटारावर गेला असता गटाराचे झाकण तुटले, तुटलेल्या झाकणा सोबतच क्लिनर विजय राठोड हाही गटारात पडला.
काशीमिरात ट्रक क्लीनरचा गटारात पडून मृत्यू
Published on

भाईंदर : काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील हटकेश परिसरात मंगळवारी, रात्री १२ वाजण्याच्या सुमारास एका ट्रक क्लीनरचा गटारात पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

काशीमिरा येथे घडलेल्या या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हटकेश येथील बसस्थानक क्रमांक १५ येथे एक वाळूने भरलेला ट्रक खाली करण्यासाठी आला होता. बांधकामाच्या ठिकाणी हा ट्रक खाली करण्यासाठी पाठीमागे घेत असताना ट्रक क्लीनर विजय राठोड हा ट्रकच्या मागे उभा राहून ट्रकला पाठीमागे येण्याचा इशारा देत होता. याच दरम्यान वाळूने भरलेल्या ट्रकचा टायर गटारावर गेला असता गटाराचे झाकण तुटले, तुटलेल्या झाकणा सोबतच क्लिनर विजय राठोड हाही गटारात पडला. घटना घडल्यानंतर लगेच ट्रक चालवत असलेल्या रमेश राठोड यांनी अग्निशमन विभाग आणि काशीमीरा पोलिसांना घटनेची माहिती दिली. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने क्लिनर विजय राठोड याचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात मृताचा भाऊ रमेश राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in