भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी–पडघा रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. गुरुवारी दुपारी घडलेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांमध्ये सईम मकबूल खोत (४८) आणि त्यांची सहा वर्षांची मुलगी मरियम खोत यांचा समावेश आहे. गंभीर जखमी पत्नी सुबी खोत यांच्यावर ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पडघा नजीकच्या बोरिवली गावातील रहिवासी सईम खोत हे गुरुवारी दुपारी पत्नी सुबी आणि मुलगी मरियमसोबत मुलीच्या तपासणीसाठी दुचाकीवरून भिवंडी येथे निघाले होते.
कुकसे गाव हद्दीतील साई धारा गोदाम कॉम्प्लेक्ससमोर मागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत खोत यांची दुचाकी ट्रकच्या चाकाखाली येऊन चिरडली गेली. यात सईम खोत आणि मुलगी मरियम यांचा जागीच मृत्यू झाला.