
भिवंडी : घरफोडी करून तांब्याचे लाखोंच्या पाइपचा माल चोरणाऱ्या कर्नाटक राज्यातील सराईत टोळीतील दोघांना गुन्हे शाखा घटक-२ च्या पोलीस पथकाने सोमवारी भिवंडीत सापळा रचून शिताफीने ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत.
लतीफ अरिफ खान (३१) आणि संगप्पा नंदप्पा सिरमकोल (४४) अशी अटक केलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत, तर त्यांचा साथीदार अमन खान आणि अन्य साथीदार फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जानेवारी रोजी गुन्हे शाखा घटक-२ चे पोलीस पथक पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ च्या अखत्यारित गस्त करीत असताना गुन्हे शाखेचे पोह. शशिकांत यादव यांना मिळालेल्या माहितीनुसार तांब्याचे पाइप चोरणाऱ्या टोळीतील चोर कल्याणकडून भिवंडीकडे जाणाऱ्या रोडवर मालाच्या विक्रीसाठी एका टेम्पोसह उभे असल्याची माहिती मिळाली. त्यानुषंगाने पोलीस पथकाने सापळा रचून लतीफ आणि संगप्पा या दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान त्यांच्याकडे कसून चौकशी केली असतात त्यांनी अमन खान आणि त्यांच्या इतर साथीदारांसह घरफोडी करून या पाइपची चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
अधिक चौकशीत चोरट्यांनी नारपोली पोलीस ठाणे हद्दीत ३ व पडघा पोलीस ठाणे हद्दीत २ ठिकाणी घरफोडीसह चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.