भरतीसाठी बसलेल्या दोघा तोतया परीक्षार्थीना पकडले

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. केंद्र शासनाच्या आदिवासी विकास मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समिती आहे.
भरतीसाठी बसलेल्या दोघा तोतया परीक्षार्थीना पकडले

भाईंदर : केंद्र सरकारच्या आदिवासी विकास मंत्रालय अंतर्गत चालणाऱ्या एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये लॅब अटेंडंटच्या पदांसाठी शनिवारी झालेल्या भरती परीक्षेत दोन तोतया परीक्षार्थी सापडले असून, भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. केंद्र शासनाच्या आदिवासी विकास मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समिती आहे. सदर समिती अंतर्गत एकलव्य मॉडेल निवासी शाळां मध्ये विविध पदांकरीता भरती आहे. शनिवार २३ डिसेंबर रोजी लॅब अटेंडंटच्या पदांसाठी लेखी परीक्षा होती. मीरारोडच्या सेव्हन स्क्वेअर अकादमी शाळेत या परीक्षेचे केंद्र होते. शनिवारी परीक्षे दरम्यान दोन तोतया परीक्षार्थी आढळून आले. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील साईनाथ अंकुश गोराडे (२८) रा. निल्लोड, तालुका सिल्लोड व राहुल शिवसिंग गोलवाल (२३) रा. हुसेनपूर, चित्ते पिंपळगाव अशी पकडण्यात आलेल्या तोतया परीक्षार्थींची नावे आहेत. हे दोघे ईश्वर भगवान निकम व शंकर रंगनाथ शेळके यांच्या नावाने परीक्षा देण्यास डमी उमेदवार म्हणून आले होते. मुख्याध्यापिका कविता हेगडे यांच्या फिर्यादीनंतर नवघर पोलिसांनी त्या चौघांवर फसवणूक आदी कलमांसह महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in