दोन सोनसाखळी चोर अटकेत

सोनसाखळी खेचून पोबारा करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.
दोन सोनसाखळी चोर अटकेत

ठाणे : सोनसाखळी खेचून पोबारा करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. सैयद मिसम अब्बास उर्फ हॅरी सैयद हुसेनी (२१), मुस्तफा सलू इराणी (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या चोरट्यांवर एकूण इतर १० गुन्हे असल्याचे उघड झाले आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ जानेवारी २०२३ रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सोनसाखळी चोरीची घटना घडली होती. या घटनेचा तपास वर्तकनगर पोलीस करीत होते. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करीत असतांना पोलिसांनी घटनास्थळ व चोरटे पळून गेलेल्या मार्गावरील तब्बल तीनशे सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता दोन्ही घटनेतील चोरटे वेगवेगळ्या मोटारसायकल वरून कल्याण-आंबिवलीच्या दिशेने पळून गेल्याची माहिती समोर आली.

त्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी चोरट्यांना पकडण्यासाठी आंबिवली येथील इराणी वस्तीत सापळा लावला असता सैयद मिसम अब्बास उर्फ हॅरी सैयद हुसेनी याने गॅलरीतून छताच्या पत्र्यावर उडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास पोलीस पथकाने पाठलाग करून पकडले. त्याच्या चौकशीतून त्याने एकूण ७ ठिकाणी जबरी चोरी केल्याचे उघड झाले. या चोरट्याच्या ताब्यातून एक चोरीची मोटारसायकल व ३० ग्रॅम सोन्याचे दागिने असा २ लाख ४० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर दुसरा चोरटा मुस्तफा सलू इराणी यास देखील पोलिसांनी आंबिवली येथे सापळा लावून अटक केली. या चोरट्याने तीन जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. त्याच्याकडून २ लाख २० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in