

शहापूर : मुंबई-नाशिक महामार्गावरील नवीन कसारा घाटात धावता ट्रक दरीत कोसळल्याची दुर्घटना शुक्रवारी घडली. ही घटना पहाटेच्या सुमारास घडले असून या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.
स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक येथून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेला सिमेंट गोणीने भरलेला ट्रक नवीन कसारा घाटातील मार्गावर ब्रेक फेल पॉइंट लगत असलेल्या दरीत कोसळला. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले असून या अपघातात ट्रकचालक मोहम्मद सौद अमीर अतीक अहमद (२७) आणि त्यांचा सहकारी अब्दुल मजीद अब्दुल वहाब (७०) यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र कसारा, ग्रामीण पोलीस रूट पेट्रोलिंग टीम, घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर काही सदस्यांनी दरीत उतरून दोघांचे मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
या अपघाताची नोंद कसारा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, अधिक तपास पोलीस करत आहेत.