

ठाणे : ठाणे शहरातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या नौपाडा परिसरातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये गुरुवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ठाणे महापालिकेचे सुरक्षारक्षक काळू गाडेकर (५३) आणि ठाणे अग्निशमन विभागाचे स्थानक अधिकारी सागर शिंदे (४३) यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला, तर अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण ठाणे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवारी पहाटे सुमारे दीडच्या सुमारास गावदेवी भाजी मार्केटमध्ये अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले आणि संपूर्ण मार्केट परिसर धुराच्या लोटांनी वेढला गेला. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षासह अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाला.
आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, तीन जम्बो वॉटर टँकर, दोन वॉटर टँकर, चार रेस्क्यू वाहने, रुग्णवाहिका तसेचमहावितरण आणनौपाडा पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.आग लागल्यानंतर मार्केटच्या वरच्या मजल्यावर असलेल्या प्रभाग समिती कार्यालयातील सुरक्षा रक्षक काळू गाडेकर हे आत अडकले होते. त्यांच्याशी अग्निशमन दलाचा मोबाईलवर संपर्क सुरू होता. ते नेमक्या कोणत्या भागात अडकले आहेत याची माहिती घेऊन त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
दरम्यान, गावदेवी मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांपेक्षा कपड्यांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक विक्रेते रात्रीच्या वेळी मार्केटमध्येच झोपत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. आग लागल्यानंतर त्यांनी वेळीच बाहेर धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. विशेष म्हणजे या इमारतीच्या वरच्या मजल्यावर नौपाडा प्रभाग समितीचे कार्यालय असून तेथे दिवसा मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असतात. घटना पहाटे घडल्याने कार्यालय बंद होते, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आगीची माहिती मिळताच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, मुख्यअग्निशमन अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
धुराचा फटका
या बचाव मोहिमेदरम्यान स्थानक अधिकारी सागर शिंदे स्वतः आतमध्ये गेले. मोठ्या प्रयत्नांनंतर काळू गाडेकर यांना बाहेर काढण्यात यश आले, मात्र तोपर्यंत दोघांनाही धुराचा मोठा फटका बसला होता. उपचारासाठी त्यांना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या दुर्घटनेत अग्निशमन विभागाचे स्थानक अधिकारी सुजित पष्टे, तांडेल समीर जाधव आणि प्रशिक्षणार्थी जवान हर्ष धुमाळ हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती स्थिर आहे.