चोरीमध्ये भागीदारी मागितल्याने दोघांनी केली एकाची हत्या; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ६ तासांतच दोन आरोपी मित्रांना अटक

ड्रायफ्रुट्स दुकानातून काजू - बदाम चोरी केलेल्या ड्रायफ्रूटसह रोख रकमेत तीन चोरट्या मित्रांपैकी एकाने भागीदारी मागितल्याने दोन साथीदार मित्रांनी आपसात संगनमताने मित्राचीच दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे
चोरीमध्ये भागीदारी मागितल्याने दोघांनी केली एकाची हत्या; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ६ तासांतच दोन आरोपी मित्रांना अटक
Published on

भिवंडी : ड्रायफ्रुट्स दुकानातून काजू - बदाम चोरी केलेल्या ड्रायफ्रूटसह रोख रकमेत तीन चोरट्या मित्रांपैकी एकाने भागीदारी मागितल्याने दोन साथीदार मित्रांनी आपसात संगनमताने मित्राचीच दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण भिवंडी मार्गावरील साईबाबा मंदिराच्या मागील जंगलात घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ६ तासांतच आरोपी दोघा मित्रांना ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत.

इकलाख अहमद अली अन्सारी (३८) व रामनारायण सितैसी चव्हाण उर्फ कल्लू (४७) अशी अटक केलेल्या मित्रांची नावे आहेत. तर आकलेश जयसिंग चौहान (३६) असे हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक आणि आरोपी हे तिघेही मित्र असून तिघांविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील मृतक आकलेश हा मुंबईतील गोरेगाव येथे राहत असून कधी मूळ गाव उत्तर प्रदेश तर कधी भिवंडीतील पद्मानगर भागात राहणाऱ्या लहान भाऊ निलेश चौहान याच्याकडे जातयेत होता. दरम्यान, या तिघांनी भिवंडी शहर पोलीस ठाणे हद्दीत १ महिन्यापूर्वी एका ड्रायफ्रुट्सच्या दुकानातून काजू, बदाम आणि रोख रक्कम चोरी केली होती. या चोरीमध्ये मृत आकलेशने भागीदारी मागितली. यामुळे तिघांमध्ये वाद होऊन इकलाख आणि रामनारायण या दोघांनी आपसात संगनमत करून आकलेशची ६ मे रोजी कल्याण-भिवंडी मार्गावरील साईबाबा मंदिराच्या मागील जंगलात नेऊन दगडाने ठेचून निर्घृण हत्या करून दोघे फरार झाले होते.

दरम्यान, घटनेची माहिती शांतीनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मृतदेह शहरातील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदनाकरिता पाठवला आहे. दुसरीकडे या खुनाच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार शांतीनगर पोलीस ठाण्याचे वपोनि विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून दोघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना हत्येची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक (प्रशा) विनोद पाटील यांनी दिली. तर मृतकचा लहान भाऊ निलेशच्या फिर्यादीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. पुढील तपास पोनि (गुन्हे) अतुल अडुरकर करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in