
डोंबिवली जवळील भोपर गावातील गावदेवी मंदिरामागील खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या सहा जणांपैकी दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. चार जणांना वाचवण्यात यश आले.
रविवार असल्यामुळे आयरे गावातील सहा मित्र पोहायला गेले होते. दरम्यान खदानीच्या खोलीचा अंदाज न आल्याने सगळे बुडायला लागले. मुलांचा बुडतानाचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी खदानीजवळ धाव घेतली. नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना अपयश आले. त्यानंतर तत्काळ अग्निशामन दलाला बोलविण्यात आले. याप्रसंगी अग्निशामन दल आणि गावकऱ्यांनी मिळून सहा पैकी चार जणांना वाचविले; मात्र यात आयुष केदारे (१३), आयुष गुप्ता (१४) या दोन मित्रांचा मृत्यू झाला. तर कीर्तन म्हात्रे, पवन चौहान, परमेश्वर घोडके, अतुल औटे या मुलांना वाचवण्यात यश आले आहे.