दोन हजार कर्मचारी करणार मराठा समाजाचे सर्वेक्षण; येत्या २३ जानेवारीपासून ठाणे महापालिकेची सुरुवात

राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाबरोबरच खुल्या प्रवर्गाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन हजार कर्मचारी करणार मराठा समाजाचे सर्वेक्षण; येत्या २३ जानेवारीपासून 
ठाणे महापालिकेची सुरुवात

ठाणे : मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी ठाणे महापालिकेने २ हजार कर्मचाऱ्यांना कामाला लावले असून, हे सर्व कर्मचारी घरोघरी जाऊन मराठा समाजाबरोबरच खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. येत्या २३ जानेवारीपासून या सर्वेक्षणाला सुरुवात होणार असून, ३१ जानेवारीपर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण होणार आहे. यासाठी एक प्रश्नावली देखील तयार करण्यात आली असून, या प्रश्नांच्या आधारे हे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाबरोबरच खुल्या प्रवर्गाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या सर्वेक्षणाला येत्या २३ जानेवारी सुरुवात करण्यात येणार आहे, तर हे काम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील महापालिका आणि तालुकास्तरावर घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी जिल्हा आणि तालुका असे दोन स्तर तयार करून प्रगणक आणि पर्यवेक्षकांना ऑनलाईन संगणक प्रणालीचे (सॉफ्टवेअर) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण करण्यासाठी ठाणे महापालिकेने सुमारे २ हजार कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in