
डोंबिवली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सिव्हिल जज (ज्युनिअर डिव्हिजन) परीक्षेत डोंबिवलीच्या स्नेहा आहेरने ६२ वा क्रमांक मिळवला तर महाराष्ट्र न्यायिक सेवा परीक्षा (JMFC) मध्ये माधुरी बगे यांनी अत्युच्च यश संपादन करून 'न्यायाधीश' म्हणून निवड होण्याचा मान मिळवला आहे.
कल्याणच्या एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या स्नेहाने जिद्द, चिकाटी, अपयशावर मात आणि वडिलांच्या स्वप्नासाठी झगडत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सिव्हिल जज (ज्युनिअर डिव्हिजन) परीक्षेत संपूर्ण राज्यात ११४ पात्र उमेदवारांपैकी ६२ वा क्रमांक मिळवत यश संपादन केले.
कल्याण पश्चिमेच्या आधारवाडी परिसरातील त्रिवेणी मेजेस्टा इमारतीत राहणाऱ्या स्नेहाचे वडील संतोष आहेर हे मुंबई उच्च न्यायालयात असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून कार्यरत आहेत. २०१४ मध्ये स्वतः एमपीएससी परीक्षेला सामोरे गेलेल्या संतोष यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी निश्चय केला की “माझी मुलगी न्यायाधीश होणार!” आणि याच प्रेरणेतून स्नेहाच्या आयुष्याला एक ध्येय लाभले. घरात नेहमी न्यायालयातील चर्चा असायची. स्नेहाही त्या चर्चांमध्ये रमू लागली, आणि तीच रुची पुढे तिच्या आयुष्याचे ध्येय ठरली. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने कॉमर्स घेतले आणि पुढे चर्चगेट येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून पाच वर्षांचे कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.२०२२ मध्ये तिने पहिल्यांदा सिव्हिल जजची परीक्षा दील्यानंतर तिला अपयश आले. मात्र तिने हार मानली नाही.
आई-वडिलांचा खंबीर पाठिंबा आणि तिची स्वतःची जिद्द यामुळे ती पुन्हा उभी राहिली. सोशल मीडिया, गप्पा, नातेवाईक यापासून दूर राहून दिवसाचे १६ तास ती अभ्यास करत होती. अखेर तिच्या अथक मेहनतीचे चीज झाले. यंदाच्या परीक्षेत तिला ६२ वा क्रमांक मिळाला आणि तिचे न्यायाधीश होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले.
माझे स्वप्न माझ्या मुलीने पूर्ण केले. मागे तिची ओळख माझ्यामुळे होती, पण आता माझी ओळख तिच्यामुळे होईल. तिच्यावर विश्वास होता आणि तिने तो सार्थ ठरवला आहे.
- संतोष आहेर, स्नेहाचे वडील
सेवानिवृत्त न्यायाधीशांची कन्या माधुरी बगे न्यायाधीश
महाराष्ट्र न्यायिक सेवा परीक्षा (JMFC) मध्ये उल्हासनगरच्या 'नारी गुरसाहनी लॉ कॉलेज'च्या माजी विद्यार्थिनी माधुरी बगे यांनी अत्युच्च यश संपादन करून 'न्यायाधीश' म्हणून निवड होण्याचा मान मिळवला आहे. माधुरी बगे या सेवानिवृत्त न्यायाधीश मधुकर बगे यांची कन्या असून, त्यांनी आपल्या संपूर्ण विधी शिक्षणाचा पाया उल्हासनगर कॅम्प ३ येथील नारी गुरसाहनी लॉ कॉलेजमध्ये रचला. शिक्षण काळातच त्यांनी मेहनत, चिकाटी आणि समर्पण यांच्या बळावर मोठे यश गाठायचे स्वप्न उराशी बाळगले होते. या कठीण स्पर्धा परीक्षेच्या तयारी दरम्यान त्यांना पुण्यातील प्रा. गणेश सिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच याआधीच न्यायाधीश पदावर निवड झालेल्या त्यांच्या मोठ्या भावाने अभिषेक बगे आणि वहिनी रेणुका बगे यांनी देखील त्यांना सतत प्रेरणा दिली. आपल्या यशाचे श्रेय माधुरी यांनी आपल्या आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंब आणि शिक्षकांना दिले आहे.
माधुरी बगेची ‘सिव्हिल जज कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी’ या पदासाठी यशस्वीरित्या निवड झाली आहे.
उल्हासनगरच्या नारी गुरसाहनी लॉ कॉलेजच्या इतिहासात ही आणखी एक गौरवशाली नोंद ठरली आहे.
त्यांच्या या ऐतिहासिक यशाचे औचित्य साधून कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सुनिता महेश्वरी, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीवर्गाने त्यांचे विशेष अभिनंदन केले.