
तालुक्यातील खाड्याचापाडा येथील तरुणाचा गुरुवारी मध्यरात्री खून झाला. मयत तरुणाला रायगड पोलिसांनी मोक्का लावला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात त्याच्याच मित्राने सहकाऱ्याच्या सहकार्याने लोखंडी हत्याराने त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, मयत तरुणाचे त्याचा गुन्ह्यातील साथीदाराच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय पोलिसांना असून पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील खाड्याचापाडा येथील सुभाष रामू खाडे हा गुरुवारी रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे त्याचे मोठे भाऊ गणेश रामू खाडे हे त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या मित्राकडे पाषाणे कातकरीवाडी येथे पोहचले. त्यावेळी तेथे मोतीराम बबन वाघ आणि शंकर नथू वाळवी हे दोघे लोखंडी हत्याराने सुभाष खाडे यास मारत होते. त्याच्या मदतीला गणेश जात असल्याचे पाहून त्या दोघांनी त्यास जखमी अवस्थेत टाकून पलायन केले. याबाबत गणेश खाडे याने तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेने सुभाष खाडे यास कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.