

ठाणे : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून घराघरांत पैशांची पाकिटे फिरत असून, कोट्यवधींच्या ऑफर दिल्या जात आहेत. त्यामुळे मतदारांनी सावध रहावे. आमची युती ही सत्तेसाठी नाही, तर मराठी माणसाला जागे करण्यासाठी आहे, असे ठाण्यातील ठाकरे बंधूंच्या सभेत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सध्या देशात अशी स्थिती आहे की देशाचे पंतप्रधान देश चालवतील असे वाटत नाही, राज्याचे मुख्यमंत्री राज्य चालवतील असे वाटत नाही. आता बडे उद्योगपती देश चालवतील. आम्ही एकत्र येत नव्हतो, तर म्हणत होते का आला नाहीत? आता एकत्र आल्यावर मला विचारणा झाली जागावाटप कसे झाले? मी त्यांना उत्तर दिले की जागावाटपासाठी, सत्तेसाठी आम्ही एकत्र आलोच नाही. मराठी माणसाला जागे करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्योगपतींच्या प्रभावाखाली देश आणि राज्य चालवले जात आहे. विकासाऐवजी विनाशाची गती सुरू आहे. मुंबई-ठाण्याची आर्थिक आणि प्रशासकीय वाताहत झाली असून महापालिकांची तिजोरी रिकामी केली जात आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
देशात आम्ही हिंदू आहोतच, पण प्रत्येक राज्यात त्या-त्या भाषेचा मान राखला गेला पाहिजे. मुंबई आणि ठाणे मराठीच राहतील. ही निवडणूक आपल्या आयुष्याची दिशा ठरवणारी असून मशाल, इंजिन आणि तुतारीला मत देण्याचे आवाहन त्यांनी केले.