Thane : 'जे शिवसेना सोडून गेले ते...'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे

शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे ठाण्यामध्ये (Thane) आले होते, यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोलेदेखील लगावले
Thane : 'जे शिवसेना सोडून गेले ते...'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी (Ekanth Shinde) बंड केले आणि त्यानंतर शिंदे - फडणवीस सरकार राज्यात आले. या सर्व घटनेनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज ठाण्यामध्ये (Thane) काही कार्यक्रमांसाठी आले होते. त्यांच्या स्वागतासाठी हजारो ठाकरे गट समर्थकांनी हजेरी लावली होती. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांसह राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील त्यांच्या स्वागतासाठी हजार होते. शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी बाईक रॅलीदेखील काढली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ठाण्यामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी सवांद साधताना, "बाळासाहेब ठाकरेंची शिकवण मानणारे अस्सल आणि कट्टर शिवसैनिक माझ्यासोबत ठामपणे उभे आहेत. आणि जे विकाऊ होते ते विकले गेले. तेही काय भावाने हे तुम्हाला माहिती आहे." असा टोला त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना लगावला.

शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ठाण्यामध्ये कार्यक्रमाला हजेरी लावून, लवकरच ठाण्यामध्ये जाहीर सभा घेणार असल्याचेही म्हंटले. ते म्हणाले की, "आत्ता फक्त शिबिरासाठी आलो आहे, भाषण करायला नंतर येईन. आज नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आलो आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये ठाणेकरांच्या राजकीय आरोग्यासाठीही मी इथे येणार आहे. अन्यायाला लाथ मारायची आहेच, पण ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे. ती आपण विसरलेलो नाही. जे निष्ठावंत आहेत, ते इकडे उपस्थित आहेत. बाकी विकाऊ होते ते विकले गेले, त्यांचा भाव सांगण्याची गरज नाही." असे म्हणताच ५० खोके एकदम ओकेच्या घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.

पुढे ते म्हणाले की, "नुकतेच संजय राऊत हे काश्मीरला जाऊन आले. तिकडेदेखील या घोषणा दिल्या जातात. महाराष्ट्रामध्ये जे काही घडले, त्यामुळे देशात महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. जे गेले ते जाऊद्या, पण जे अस्सल शिवसैनिक पक्ष आणि माझ्यासोबत राहिले, हे जे निखारे आहेत तेच उद्या मशाल पेटवणार आहेत." असा विश्वासदेखील त्यांनी दर्शवला. त्यांनी यावेळी ठाण्यातल्या टेंभी नाका भागात जाऊन आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

logo
marathi.freepressjournal.in