
सरा मेळाव्याची दोन्ही गटाकडून जय्यत तयारी सुरू असताना शिंदे गटातील प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना भावनिक पत्र लिहले आहे. या पत्रात उद्धव ठाकरे याच्यावर निशाणा साधला असून उद्धव ठाकरेंना खुर्चीचा मोह असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राज्यात सत्तातरांनतर शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जोरदार वादविवाद सुरू असल्याचे अनेकवेळा पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री शिंदेनी फारकत घेतल्यानंतर सर्वच बंडखोरांवर आरोप होत असताना आमचीच खरी शिवसेना अशी भूमिका शिंदे गटाकडून वेळोवेळी व्यक्त करण्यात येत आहे. म्हस्के यांनी बाळासाहेब ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात 'ज्यांच्याशी संघर्ष केला त्याच्याच बरोबर मोहापायी उद्धव ठाकरे सत्तेत सहभागी' झाले. साहेब तुम्ही गेलात आणि आपल्या शिवसेनेच्या वाघाला कोण्या शिकाऱ्याने गुंगीचे इंजेक्शन दिले आहे. या गुंगीच्या इंजेक्शनचा प्रभाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. शिवसेनेचा कणा हळूहळू मोडताना पाहून तुमच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील हे आम्हाला दिसत होते. यावर आम्ही बोललो की आमचा आवाज दाबला जात असल्याची खंत म्हस्के, यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली.
बाळासाहेब आपण कधीही खुर्चीचा मोह धरला नाही, पण तुम्ही गेलात आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आम्हाला बसावे लागले. शिवसेनेवर पदोपदी अन्याय होऊ लागला. कित्येक शिवसैनिकांवर मोक्का, तडीपारी लादण्यात आला असल्याचे म्हस्के यांनी पत्रात नमूद केले आहे.
आम्ही हिंदुत्ववादाचा वारसाच पुढे घेऊन जात आहोत
आम्ही तुमच्या ज्वलंत हिंदुत्ववादाचा वारसाच पुढे घेऊन जात आहोत. या खडतर मार्गावर तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत याची खात्री आहेच. "बाळासाहेब, नामदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नावाचा वाघ आहे, तोवर हिंदुत्वाला जाग आहे." आपण आमच्या रक्तात होतात....आहात....आणि रहाल. असे भावनिक पत्र शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी बाळासाहेब ठाकरे यांना लिहून पत्रातून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.