मोखाडा : मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम उधळे हट्टीपाडा येथील अरुंद पुलाची अवस्था अत्यंत जीर्ण झालेली आहे. त्यामुळे वाहनांना व पादचाऱ्यांनाही धोकादायक परिस्थितीत प्रवास करावा लागत आहे; मात्र या पुलाच्या दुरुस्तीबाबत जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कमालीचे दुर्लक्ष केले असून, येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनीही डोळेझाक केल्याने तब्बल २ हजार लोकवस्ती असलेले गाव बाधित झाले आहे.
अवघे दीड किलोमीटर अंतर पार करून हट्टीपाडा ते उधळे येथून हमरस्त्यावर येण्यासाठी हट्टीपाडा ग्रामस्थांना पावसाळ्यात मात्र किनीस्ता मार्गे १० किलोमीटरचा हेलपाटा मारून हमरस्ता गाठावा लागतो. हट्टीपाडा येथील धोकादायक पुल हा गारगाई नदीला जोडणाऱ्या मोठ्या ओहळावर बांधलेला आहे. पावसाळ्यात या पुलावर मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी असते, तर खालून संततधार ओहळ वाहत असतो. तसेच अरुंद धोकादायक पूल आणि चाळण झालेला रस्त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. अशा परिस्थितीत एखाद्या गाडीला अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न आहे.
याबाबत जिल्हा परिषदेच्या मोखाडा येथील उपविभागाशी संपर्क साधला असता, येथील पुलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असल्याचे व तो नामंजूर झाल्याचे व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी करण्याचा ढोबळ सल्ला मिळाला. तथापी जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असल्याचे सांगितले असता, पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करणार असल्याचे येथील प्रभारी उपअभियंता अजय गायकवाड यांनी सांगितले आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे त्याबाबत विचारणा केली असता, तसा कोणताही प्रस्ताव या कार्यालयाकडून मंजुरी दाखल सादर केला नसल्याचे येथील उप अभियंता विशाल अहिरराव यांनी सांगितले आहे.