विजय पंचमुख/ बदलापूर:
रात्रीपासून सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. बदलापुरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने नदीलगतच्या सखल भागात पाणी साचू लागले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरातील सखल भाग जलमय होऊन पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून सुमारे ३०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. उल्हास नदीचे उगमस्थान असलेल्या लोणावळा, कर्जत आदी पट्ट्यातही पावसाचा जोर कायम आहे. उल्हासनदी जवळच्या मांजरली, हेंद्रेपाडा, वालीवली, सोनिवली आदी सखल भागात पाणी शिरून रस्ते पाण्याखाली गेले. या पार्श्वभूमीवर कुळगाव-बदलापूर नगरपरिषद सज्ज झाले आहे.
त्यांचे सहकारी उल्हासनदी परिसरात तळ ठोकून आहेत. शहराच्या सखल भागातील पाण्याच्या पातळीवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याशिवाय एनडीआरएफची टीमही बदलापुरात दाखल झाली आहे.
कर्जत-बदलापूर रस्ता पाण्याखाली-
उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने बदलापूर-वांगणी दरम्यानच्या कर्जत-बदलापूर रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे या पाण्यातून वाट काढत वाहने चालवताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. दरम्यान, अशा परिस्थितीत या रस्त्यावर वाहनाने प्रवास करणे धोकादायक असल्याचे सांगत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी कुळगाव ग्रामीण पोलिसांनी वाहनचालकांनी या रस्त्यावरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हा रस्ता वाहनांसाठी बंद केला होता. कुळगाव पोलीस ठाण्याचे सपोनि गोविंद पाटील व त्यांचे सहकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.