
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये अवघ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या गर्भवती होण्याची आणि मृत अपत्याला जन्म देण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र या प्रकरणाचा सर्वात भीषण आणि सत्य उघड करणारा टप्पा तेव्हा समोर आला, जेव्हा मृत बाळ गुपचूप जमिनीत दफन केल्याची बाब पोलिसांना कळली आणि त्यांनी ते शव जमिनीतून बाहेर काढून डीएनए तपासणीसाठी पाठवले. या प्रकरणात विठ्ठलवाडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. सामाजिक संवेदनशीलतेच्या पलीकडे जाणाऱ्या या प्रकरणाने संपूर्ण शहराला हादरवून टाकले आहे.
उल्हासनगर शहरात अवघ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने एका गोंडस अपत्याला जन्म दिला, मात्र ते अपत्य मृतावस्थेत जन्माला आले. या धक्क्याने हादरलेल्या कुटुंबीयांनी कोणालाही न सांगता मृत अपत्य गुपचूप जमिनीत दफन केले. मात्र, या घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याला मिळताच त्यांनी गंभीर दखल घेत तपास सुरू केला.
रुग्णालयातून प्राप्त झालेल्या MLC अहवालाच्या आधारे पोलिसांनी मुलीची प्रसूती झाली असल्याचे लक्षात येताच चौकशीचा वेग वाढवला. अपत्याच्या मृत्यूबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचे शव जमिनीतून बाहेर काढले आणि डीएनए चाचणीसाठी पाठवले आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. तपास अधिकाधिक गती घेत असून, न्याय मिळेपर्यंत पोलिसांचा कठोर पाठपुरावा सुरूच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.