
छतावरून घरात पडणारं पावसाचं पाणी थांबवण्यासाठी तो गेला होता… पण नियतीनं त्याचं आयुष्यच थांबवलं. उल्हासनगरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी एक होतकरू युवक केवळ महावितरणच्या निष्काळजीपणामुळे आपल्या आयुष्याला मुकला आहे. घराचे गळके छत वाचवताना विजेच्या उघड्या तारांनी त्याला हिरावून नेले. यामागे जबाबदार कोण? तक्रारी असूनही दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? हा प्रश्न आता संपूर्ण शहरात विचारला जात आहे.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक २ जवळील शास्त्रीनगर परिसरातील पंजाबी कॉलनीमध्ये सोमवारी एक दुर्दैवी घटना घडली. १७ वर्षीय आयुष रॉय हा आपल्या वडिलांसोबत घराच्या गळणाऱ्या छतावर प्लास्टिक टाकण्यासाठी गेला असताना, त्याचा स्पर्श उघड्या विजेच्या तारांशी झाला आणि त्याला तीव्र स्वरूपाचा विजेचा शॉक बसला. काही क्षणांतच आयुष बेशुद्ध पडला. तातडीने त्याला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी महावितरण विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मृत आयुषच्या नातेवाईकांनी सांगितले की, छतावरून गेलेल्या उघड्या विजेच्या तारांविषयी त्यांनी यापूर्वीच महावितरणकडे तक्रार केली होती. मात्र, त्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. कोणताही अधिकारी वा कर्मचारी पाहणीसाठी घटनास्थळी आला नव्हता. याच निष्काळजीपणामुळे एका निष्पाप विद्यार्थ्याचा बळी गेला, असा संताप नागरिकांनी व्यक्त केलाय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. शेजारी-पाजारी, मित्रमंडळी आणि नागरिकांनी घरासमोर एकत्र येऊन महावितरणच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. काही नागरिकांनी तर दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर महावितरण विभागाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. मात्र अनेक झोपडपट्टी आणि कमी उंचीच्या घरांवरून विजेच्या तारांमध्ये अंतर नसल्याने भविष्यात आणखी अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली. एकीकडे महावितरण विभागाने लोकांचे विजेचे थकबाकीचे पैसे वसूल करण्यासाठी मोहीम उघडली आहे, पण दुसरीकडे त्यांच्या सुरक्षेसाठी मूलभूत उपाययोजना करण्यात हेच विभाग अपयशी ठरत आहेत, ही बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली नाही, तर प्रशासनाविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.