
नवनीत बऱ्हाटे/ उल्हासनगर
विभाजनाच्या जखमांवर फुंकर घालत पाकिस्तानातून आलेल्या ५४ सिंधी हिंदूंनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अखेर भारताच्या कुशीत आश्रय घेतला आहे. १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) माध्यमातून त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. उल्हासनगरातील सिंधी भवन येथे आयोजित कार्यक्रमात या नव भारतीयांनी कृतज्ञतेने आपल्या भावना व्यक्त करताना, "आता आम्ही आणि आमचा धर्म भारत मातेच्या कुशीत सुरक्षित आहोत," असे उद्गार काढले.
राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद, महाराष्ट्र सिंधी साहित्य अकॅडमी, सिंधी कलाकार संगम, आणि उल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने "विभाजन विभाषिका स्मृती दिवस" सिंधी भवन येथे साजरा करण्यात आला. यावेळी नव भारतीयांचा सत्कार करण्यात आला, आणि त्यांच्या पाकिस्तानातील अत्याचारांची कहाणी उलगडली गेली. "भारताच्या कुशीतच आपला धर्म सुरक्षित आहे," असे सांगताना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
यावेळी महाराष्ट्र सिंधी साहित्य अकॅडमीचे अध्यक्ष महेश सुखरामानी, पालिका आयुक्त अजिज शेख, अतिरीक्त आयुक्त किशोर गवस, लाल पंजाबी, राजेश वधाऱ्या, राजू जग्यासी, विनोद तलरेजा आदी मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापिका प्रिया वाच्छानी आणि सीमा मेंघानी यांच्या प्रयत्नातून सिंधी भवन येथे तळ मजल्यावर प्रदर्शनाचे आयोजन केले होते. प्रकाश देवानी, अनित कुमार आसानी, आणि दिलीप हुंदलानी यांसारख्या नव भारतीयांनी पाकिस्तानातील जाचक जीवनाची कहाणी रेखाटली. त्यांनी सांगितले की, "पाकिस्तानात अल्पसंख्याकांना सतत छळ, खंडणी, आणि धर्मांतराचा त्रास सहन करावा लागतो. हिंदू मुलींचे बलपूर्वक धर्मांतर केले जाते." भारताच्या नागरिकत्वामुळे ते आता सुरक्षित आणि मुक्त असल्याचा अनुभव घेत आहेत.
१३ ते १५ वर्षांच्या मुलींचे अपहरण केले जाते, त्यांच्यावर जबरदस्ती अत्याचार करून, मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जाते. हे दु:ख सहनशीलतेच्या पलीकडे गेले असल्याने त्यांनी पाकिस्तान सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले, आज मोदी सरकारमुळे आम्हाला भारतीय नागरिकत्व मिळाले आहे, त्यासाठी आम्ही आभारी आहोत. - प्रकाश देवानी
कराचीमध्ये मार्बलचा व्यवसाय करताना दररोज गोळ्यांचे आवाज ऐकावे लागायचे, हिंदूंसाठी तिथले वातावरण सुरक्षित नव्हते. तिथल्या हिंदू व्यावसायिकांना दररोज खंडणी द्यावी लागत होती आणि तिथे राहायचे असेल तर धर्म बदलण्याचा दबाव होता. अनित २०१३ मध्ये आपल्या कुटुंबासह भारतात आले आणि आता त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाल्यामुळे ते सुरक्षित असल्याचे सांगतात. - अनित कुमार आसानी
विभाजनाची वेदना आणि अखंड भारताचे स्वप्न
या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदानंद सप्रे यांनी विशेष उपस्थिती लावली होती. त्यांनी अखंड भारत या संकल्पनेवर जोर देत, इस्रायल देशाचे उदाहरण देऊन सांगितले की, पुन्हा एकदा पाकिस्तान व्याप्त सिंध प्रांतात हिंदूंची घरे असतील, असे आशादायी विधान केले. यावर सर्व सिंधी भाषिकांनी उभे राहून टाळ्या वाजवून या विचाराचे स्वागत केले.
भारतात एक नवा संसार
भारतीय सिंधू सभा नावाच्या संघटनेने या सिंधी भाषिकांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले आहेत. संघटनेच्या म्हणण्यानुसार, नवीन सीएए कायद्यामुळे गेल्या १० ते १५ वर्षांपासून नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या १५० लोकांपैकी ५४ जणांना केवळ तीन महिन्यांत नागरिकत्व मिळाले आहे. उर्वरित अर्ज प्रलंबित असून, त्यांनाही लवकरच भारतीय नागरिकत्व मिळण्याची आशा आहे. उल्हासनगरच्या सिंधी समाजाने या नव्या आश्रयाचा उत्सव साजरा करताना, आपल्या मातृभूमीबद्दलच्या निष्ठेचे आणि कृतज्ञतेचे दर्शन घडवले. पाकिस्तानातील प्रतिकूल परिस्थितीतून सुटलेल्या या हिंदूंसाठी आता भारतात एक नवा संसार सुरू झाला आहे.