उल्हासनगर : भाड्याच्या वादातून सलूनचालकाची चाकूने भोसकून हत्या

उल्हासनगरमध्ये एका सलूनचालकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना उल्हासनगर कॅम्प १ मधील ए-वन तबेल्याजवळ घडली.
उल्हासनगर : भाड्याच्या वादातून सलूनचालकाची चाकूने भोसकून हत्या
Published on

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये एका सलूनचालकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना उल्हासनगर कॅम्प १ मधील ए-वन तबेल्याजवळ घडली. मृतक इलियास शेख (राहणार अंबरनाथ, जावसई गाव) यांनी भाड्याने घेतलेल्या दुकानात सलून चालवत होते. भाड्यावरून झालेल्या वादातून शेरा माखिजा यांनी त्यांच्यावर चाकूने वार केला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री शेरा माखिजा यांनी दुकानात येऊन इलियास शेखकडे दुकानाच्या भाड्याची मागणी केली. मात्र, इलियास शेख यांनी भाडे दोन दिवसात देणार असल्याचे सांगितले.

यामुळे संतापलेल्या माखिजा यांनी वाद घालत इलियास शेख यांच्या पोटात चाकू खुपसला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेख यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, शुक्रवारी दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उल्हासनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी शेरा माखिजा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेने कॅम्प १ परिसरात खळबळ उडाली आहे, तसेच व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

logo
marathi.freepressjournal.in