
उल्हासनगर : एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या नराधमाने, गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून तिचा गर्भपात घडवून आणला आणि सात महिन्यांचे भ्रूण जमिनीत पुरून टाकले होते. या घटनेतील मुख्य आरोपी सागर ढमढेरेला पोलिसांनी अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सागर ढमढेरेने आपल्या घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला, ज्यामुळे ती सात महिन्यांची गरोदर राहिली.
हे समजल्यानंतर, हा गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्या मुलीचा सातव्या महिन्यात गर्भपात झाला आणि त्यानंतर हा प्रकार कुणालाही समजू नये म्हणून गर्भ एका ठिकाणी गुपचूप पुरण्यात आला होता. गर्भपातानंतर मुलीची तब्येत खालावत गेली आणि तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांना काही संशय आला आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तपासासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. दरम्यान, पोलिसांनी गर्भपात झालेल्या भ्रूणाचे डीएनए नमुने घेतले असून, त्याचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.