
उल्हासनगर : समाजाच्या आरोग्यसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या आशासेविकांना त्यांचे कर्तव्य बजावत असताना मारहाण आणि विनयभंगाचा सामना करावा लागतो, ही बाब अत्यंत संतापजनक आणि लाजीरवाणी आहे. या निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणाचा निषेध करत सोमवारी महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशास्वयंसेविका संघाच्या वतीने मोठ्या संख्येने मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात सहभागी झालेल्या आशासेविकांनी संबंधित आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांच्या तत्काळ निलंबनाची जोरदार मागणी केली.
उल्हासनगर कॅम्प नंबर ४ येथील भरतनगर भागात टीबी सर्वेक्षण करणाऱ्या दोन आशासेविकांना आकाश वानखेडे या तरुणाने अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. या हल्ल्यात दोन्ही सेविका गंभीर जखमी झाल्या होत्या. या घटनेची तक्रार करण्यासाठी त्या पोलीस ठाण्यात पोहोचल्या, मात्र विठ्ठलवाडी पोलिसांनी तब्बल पाच तास तक्रार घेण्यास विलंब करत टाळाटाळ केली. संतप्त झालेल्या शेकडो आशासेविकांनी संघटनेचे सरचिटणीस भगवान दवणे, गंगाताई लोंढे आणि डॉ. रासकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन केले.
आता पुढे काय?
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा विरोधात आशासेविकांनी उचललेले हे पाऊल प्रशासनाला जबाबदार धरण्यासाठी महत्त्वाचे आहे. या प्रकरणात पोलिसांनी विलंब का केला? आरोग्य अधिकारी का निष्क्रिय राहिले? आणि आशासेविकांना भविष्यात अशा घटनांपासून कसे संरक्षण मिळणार? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.