

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकाच्या स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) मधील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहे. पक्षातीलच सदस्याने क्रॉस वोटिंग केल्याने सत्ताधारी गोटात फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले.
शहरातील स्वच्छता आणि वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या पावर स्वीपिंग आणि मिस्ट स्प्रे मशीनच्या संचालन व देखभालीचे काम कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चरला देण्याचा प्रस्ताव समितीसमोर मांडण्यात आला होता. तांत्रिक मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे हा करार १५ ऑक्टोबर २०२४ ते १४ ऑक्टोबर २०२९ या कालावधीसाठी देण्याची योजना होती. निविदा प्रक्रिया आधीच पूर्ण झाल्याने नव्याने ई-टेंडर न काढता मंजूर दरांवर प्रस्ताव ठेवण्यात आला.
मात्र या प्रस्तावावरून समितीत जोरदार राजकीय नाट्य रंगले. भाजप गटनेते राजेश वधारिया आणि कंपनीशी संबंधित नंद जेठाणी यांच्यातील कथित मतभेदांमुळे पक्षात नाराजी निर्माण झाल्याची चर्चा आहे.
शिवसेना व भाजप यांचे संख्याबळ समान असताना उपमहापौर अमर लुंड यांचे भाऊ व भाजपचे नगरसेवक शेरी लुंड यांनी शिवसेनेच्या बाजूने मतदान करत पक्षविरोधी भूमिका घेतली. परिणामी ९ विरुद्ध ७ मतांनी प्रस्ताव मंजूर झाला.
या घटनेनंतर भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली असून, स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीतील या घडामोडींमुळे पुढील निर्णय प्रक्रियेवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील राजकीय वातावरणही या प्रकरणामुळे अधिक तापले आहे.