उल्हासनगर राज्यातील राजकारणाचे नवे ‘हॉटस्पॉट’; भाजप-शिंदे संघर्षाची सुरुवात उल्हासनगरातूनच - फडणवीस

राज्यातील राजकारण नेहमीप्रमाणे मुंबई-पुणेपुरते मर्यादित न राहता आता उल्हासनगराभोवती फिरू लागले आहे. भाजप-शिवसेना शिंदे गटातील फोडाफोडीची सुरुवात उल्हासनगरातून झाली, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आणि या एका वक्तव्याने संपूर्ण राज्याचे राजकीय लक्ष उल्हासनगरकडे वळले आहे.
उल्हासनगर राज्यातील राजकारणाचे नवे ‘हॉटस्पॉट’; भाजप-शिंदे संघर्षाची सुरुवात उल्हासनगरातूनच - फडणवीस
Published on

उल्हासनगर : राज्यातील राजकारण नेहमीप्रमाणे मुंबई-पुणेपुरते मर्यादित न राहता आता उल्हासनगराभोवती फिरू लागले आहे. भाजप-शिवसेना शिंदे गटातील फोडाफोडीची सुरुवात उल्हासनगरातून झाली, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आणि या एका वक्तव्याने संपूर्ण राज्याचे राजकीय लक्ष उल्हासनगरकडे वळले आहे. महायुतीतील अंतर्गत तणाव, जलद गतीने होणारे पक्षप्रवेश, नेतृत्वातील अस्वस्थता आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदलणारे स्थानिक समीकरण या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी आता उल्हासनगर शहर आहे.

१३ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपच्या माजी नगरसेविका मीना सोंडे आणि माजी नगरसेवक किशोर वनवारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या दोन प्रभावी नेत्यांच्या जाण्यामुळे स्थानिक भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आणि महायुतीत मैत्रीपूर्ण लढत राहील का, याबाबत संभ्रम निर्माण झाला.

दुसऱ्याच दिवशी टीम ओमी कलानीने भाजपचे जेष्ठ नेते व माजी नगरसेवक जमनू पुरस्वानी, महेश सुखरामानी, प्रकाश मखिजा आणि राम (चार्ली) पारवानी यांना गटात दाखल केले. कार्यक्रमात या नेत्यांनी शिवसेना शिंदे गटाचे चिन्ह-झेंडे धारण केल्याने प्रवेशाच्या मागे शिंदे गटाचा राजकीय प्रभाव अधोरेखित झाला. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रत्यक्ष उपस्थित होते.

राजकीय तापमान वाढले

रवींद्र चव्हाण अर्धी शिवसेना भाजपमध्ये घेणार, अशी चर्चाही शहरात रंगली, ज्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढली. तणाव एवढा वाढला की काही शिंदे गटातील मंत्री कॅबिनेट बैठकीत गैरहजर राहिले आणि भाजप युतीधर्म पाळत नाही, अशी तक्रार फडणवीसांकडे केली. त्यावर फडणवीसांनी स्पष्ट उत्तर दिले, फोडाफोडीची सुरुवात तुम्हीच उल्हासनगरातून केली. हे विधान बाहेर येताच राज्यभर राजकीय तापमान तापल्याचे चित्र पहावयास मिळाले.

उल्हासनगरचा थेट प्रभाव

तणाव वाढल्याने मुंबईत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेण्यात आली. पुढील काळात नेते-कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश परस्पर संमतीशिवाय होऊ नयेत आणि महायुतीच्या प्रतिमेला तडा जाणार नाही याची काळजी घ्यावी, असा निर्णय झाला. उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर न होता देखील या शहरात चालू असलेली राजकीय हालचाल राज्यातील महत्त्वाचा ‘पॉवर सेंटर’ ठरत आहे. पुढील काळातील युतीचे समीकरण, पक्षांतरे, उमेदवारी आणि प्रदेश पातळीवरील रणनीतीवर उल्हासनगरचा थेट प्रभाव राहणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in