Ulhasnagar: आपटी नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

उल्हासनगर : धुळवडीच्या रंगांमध्ये न्हालेल्या तरुणांचा जल्लोष काही क्षणांतच दुःखात बदलला, जेव्हा उल्हासनगरच्या नासीर शेख या तरुणाचा आपटी नदीत बुडून मृत्यू झाला. मित्रांसोबत आनंदाने पोहायला गेलेल्या नासीरसाठी ही सफर शेवटची ठरली. २४ तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर अखेर शनिवारी त्याचा मृतदेह हाती लागला.
Ulhasnagar: आपटी नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
प्रतिकात्मक फोटो
Published on

उल्हासनगर : धुळवडीच्या रंगांमध्ये न्हालेल्या तरुणांचा जल्लोष काही क्षणांतच दुःखात बदलला, जेव्हा उल्हासनगरच्या नासीर शेख या तरुणाचा आपटी नदीत बुडून मृत्यू झाला. मित्रांसोबत आनंदाने पोहायला गेलेल्या नासीरसाठी ही सफर शेवटची ठरली. २४ तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर अखेर शनिवारी त्याचा मृतदेह हाती लागला. विशेष म्हणजे, नासीरच्या बुडतानाची संपूर्ण दृश्य मोबाईलमध्ये कैद झाली असून, त्याचा जीव वाचविण्यासाठीचा थरार पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे.

धुळवडीचा रंग खेळून थकलेल्या नासीर शेखने (३२) मित्रांसोबत थोडा विरंगुळा म्हणून अंबरनाथच्या आपटी नदीत पोहण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. उत्साहाच्या भरात सर्वजण पाण्यात उतरले, मात्र नासीरसाठी हा क्षण जीवघेणा ठरला. खोल पाण्यात तो अडकला, हात-पाय मारत मदतीसाठी आक्रोश करत राहिला, पण काही क्षणांतच तो वाहून गेला. ही संपूर्ण घटना एका व्यक्तीने मोबाईलमध्ये चित्रीत केली. व्हिडीओमध्ये नासीर पाण्यात बुडत असल्याचे स्पष्ट दिसत आहे, मात्र कोणीही त्याला वाचवण्यासाठी धावून गेले नाही. या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवली असून, ‘कोणी मदतीसाठी पुढे का आले नाही?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिक, मित्र, आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने नासीरच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर २४ तासांच्या अथक शोधानंतर शनिवारी दुपारी नासीरचा मृतदेह सापडला. त्याला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

धुळवडीच्या दिवशी सात जणांचा मृत्यू

धुळवडीच्या उत्सवामध्ये पाण्यातील आनंद जीवघेणा ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अंबरनाथ, बदलापूर आणि वांगणी परिसरात एकूण सात जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक प्रशासनाने यावर चिंता व्यक्त करत जलप्रवाहात पोहताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in