
उल्हासनगर : उल्हासनगरच्या औद्योगिक क्षेत्रातील सेंच्युरी कंपनीत कामगारांसाठी दिल्या जाणाऱ्या कूपनच्या नावाखाली लाखोंच्या घोटाळ्याची उघडकी आली आहे. कँटीनशी संबंधित कर्मचारी, दलाल आणि जवळच्या प्रिंटिंग प्रेसच्या मालकाने मिळून नकली कूपन छापले होते.
कंपनीत कामगारांना नाश्ता, चहा आणि पाव यासाठी अनुक्रमे चार, तीन आणि दोन रुपयांचे कूपन दिले जातात. ही साधी योजना काही भ्रष्ट मंडळींसाठी सोन्याची खाण ठरली, कारण त्यांनी मूळ कूपनाची हुबेहूब नक्कल करून हजारो बनावट कूपन छापले. या बनावट कूपनांचा वापर करून कँटीनमधून मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ घेऊन लाखोंची आर्थिक हेराफेरी केली गेली.घोटाळा मूळ प्रिंटर संचालकाच्या जागरूकतेमुळे उघड झाला. त्याने तातडीने कंपनी व्यवस्थापनाला माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या पथकाने तपास सुरू केला. कारवाई दरम्यान प्रिंटिंग प्रेसवर धाड टाकून छपाईसाठी वापरलेली यंत्रणा आणि तब्बल ७८ हजार रुपयांच्या जाली कूपनचा साठा जप्त करण्यात आला.
घोटाळ्यातील तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या कोणीही अटकेत नाही. पोलीस तपास जलद गतीने सुरू करण्यात आला आहे. या घोटाळ्यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, कंपनी व्यवस्थापनाने कँटीन योजनेतील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्याचे संकेत दिले आहेत.