

उल्हासनगर : हनुमानाच्या पराक्रमाने लंकादहनाचा थरार, प्रभू श्रीरामांच्या हस्ते रामेश्वराची स्थापना आणि बिभीषणाच्या शरणागतीचा हृदयस्पर्शी प्रसंग पाहून प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले. ‘जय श्रीराम’च्या गगनभेदी जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला. उल्हासनगरातील सेंच्युरी रेयॉनच्या कामगारांनी ४४ वर्षांची परंपरा जपत साकारलेल्या भव्य रामलीलेत भक्ती, श्रद्धा आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.
उल्हासनगरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या कामगारांकडून गेल्या ४४ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या पारंपरिक श्रीरामलीलेत शनिवारी लंकादहन, रामेश्वराची स्थापना आणि विभीषणाच्या शरणागतीचे प्रसंग प्रभावीपणे सादर करण्यात आले. हनुमानाने आपल्या शेपटीला लागलेल्या आगीने लंका पेटविल्याचा थरारक प्रसंग रंगमंचावर साकारताच उपस्थित भाविकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर प्रभू श्रीरामांनी रामेश्वराची स्थापना केल्याचा भक्तिमय प्रसंग आणि विभीषणाने श्रीरामांच्या चरणी शरणागती पत्करल्याचे भावनिक दृश्य पाहून प्रेक्षक भारावून गेले.
कलाकारांचा प्रभावी अभिनय, दमदार संवाद आणि आकर्षक रंगमंच सजावटीमुळे रामायणातील प्रसंग जणू प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभे राहिले. संपूर्ण मैदान ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमून गेले. ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सेंच्युरी रेयॉनमधील कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सहभागातून साकारली जाणारी रामलीला आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे रामायणातील सर्व पात्रे कंपनीचे कामगार आणि त्यांच्या मुलांनी साकारली आहेत. करण दुबे (श्रीराम), मोहित दुबे (लक्ष्मण), रोहित मंडल (सीता), तर सूरज उपाध्याय (रावणाची) भूमिका साकारत आहेत. एस. आर. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ३५ कलाकार रामायणातील प्रसंग जिवंत करत आहेत.
राजकुमार दुबे गेल्या ४४ वर्षांपासून रामलीलेचे संचालन करत आहेत. कंपनीचे उपाध्यक्ष श्रीकांत गोरे, जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांचे कुटुंबीय कार्यक्रमात सहभागी होत आहेत.
उल्हासनगरसह कल्याण, अंबरनाथ आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामलीला मैदानावरील दसरा मेळाही नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. घरगुती वस्तू, खेळणी आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समुळे परिसराला पारंपरिक जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. धार्मिक श्रद्धेबरोबरच कामगार एकता, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक वारसा जपणारी ही रामलीला उल्हासनगरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग बनली आहे.