उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शहरातील राजकारण अक्षरशः रणांगणात रूपांतरित झाले. काही तास शिल्लक असतानाच तिकीट बदल, एबी फॉर्मचा गोंधळ, अचानक पक्षांतर आणि बंडखोरीच्या भीतीने उमेदवारांची प्रचंड दमछाक झाली. उल्हासनगर महानगरपालिकेच्या ७८ जागांसाठी शेवटच्या दिवशी ६९५ अर्ज दाखल करताना अनेक पक्षांमध्ये उमेदवारी बदलण्याची धावपळ पाहायला मिळाली.
उमेदवारी मिळवण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोल्यांट्या उडवण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आणि त्याचा थेट परिणाम निवडणूक कार्यालयांतील गर्दी व प्रशासनावर दिसून आला. काही उमेदवारांना ऐनवेळी तिकीट नाकारण्यात आल्याने नाराज इच्छुकांनी दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेऊन थेट अर्ज दाखल केला. शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी, ठाकरे गट, मनसे यांसह अनेक पक्षांमध्ये शेवटच्या क्षणी झालेल्या या उलथापालथीमुळे राजकीय समीकरणे सतत बदलताना दिसत होती.
बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर न करण्याची रणनीती अवलंबली. त्यामुळे इच्छुक उमेदवार सकाळी लवकरपासूनच अर्ज दाखल करण्यासाठी रांगेत उभे राहिले. एबी फॉर्म बदलण्याच्या भीतीने अनेक उमेदवारांमध्ये अस्वस्थता दिसून आली. काही ठिकाणी उमेदवारीवरून पक्ष कार्यालयांमध्ये जोरदार वाद झाले असून इच्छुकांनी थेट पक्षप्रमुखांना जाब विचारल्याचेही चित्र दिसले.
दुपारनंतर काही दिग्गज उमेदवारांनी समर्थकांसह मिरवणुका काढल्याने निवडणूक केंद्रांवरील गर्दी आणखी वाढली. त्यातच अंतिम निर्णय न झाल्याने सर्व पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवारही मोठ्या संख्येने अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाले. परिणामी, शहरातील सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना उमेदवारी अर्ज स्वीकारताना तारेवरची कसोटी पार करावी लागली.
यंदाची निवडणूक अधिकच चुरशीची आणि रंगतदार
शहरातील अनेक भागात भुयारी गटार कामांमुळे आधीच वाहतूककोंडी असताना, निवडणूक कार्यालयांजवळील रस्ते बंद केल्याने महत्त्वाच्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. एकूणच, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची धावपळ, पक्षांतरांची कोलांट्याउडी आणि प्रशासनावरील वाढता ताण यामुळे उल्हासनगर महापालिका निवडणूक अधिकच चुरशीची आणि रंगतदार झाली आहे.