उल्हासनगर : वादग्रस्त नगररचनाकार प्रकाश मुळे अखेर कार्यमुक्त; महापालिका आयुक्त अजीज शेख यांचे लेखी आदेश

प्रकाश मुळे यांनी नगररचनाकार म्हणून कार्यभार सांभाळल्यापासून त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले...
उल्हासनगर : वादग्रस्त नगररचनाकार प्रकाश मुळे अखेर कार्यमुक्त; महापालिका आयुक्त अजीज शेख यांचे लेखी आदेश
Published on

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेचे वादग्रस्त नगररचनाकार प्रकाश मुळे यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. मनपा आयुक्त अजीज शेख यांनी कार्यालयीन आदेश जाहीर केले आहेत. मुळे यांनी चुकीच्या पद्धतीने इमारतीचे नकाशे मंजूर करणे, प्रशासनाची मंजुरी नसतांना खासगी कर्मचाऱ्यांना नेमून स्वतःची कामे करणे, यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्यात आले असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

प्रकाश मुळे यांनी नगररचनाकार म्हणून कार्यभार सांभाळल्यापासून त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत मनपा आयुक्त अजीज शेख यांनी चौकशी करण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिले होते, या संदर्भात अहवाल आयुक्तांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. मुळे यांच्यावर कारवाई करण्याच्या कार्यालयीन आदेशात आयुक्त अजीज शेख यांनी म्हटले आहे, की प्रकाश मुळे, नगररचनाकार हे सन २०२१ पासून उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत.

उल्हासनगर शहराच्या विकास २०१७ च्या मंजूर विकास आराखड्यानुसार करणे बंधनकारक आहे. सोबतच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ तसेच एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) मधील तरतुदीनुसार इमारत बांधकाम नकाशे मंजुरीची कार्यप्रणाली अवलंबून बांधकाम नकाशे मंजूर करणे, नगररचना विभागाचे मूळ काम आहे. तथापि, नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी शहरातील अनेक इमारतीचे बांधकाम नकाशे मंजूर करतांना शहराच्या विकास योजनेतील प्रावधाने व विनियम लक्षात न घेता चुकीच्या पध्दतीने बांधकाम नकाशे मंजूर केले आहेत.

सदर बाब तक्रारदारांनी निदर्शनास आणून देऊन त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे व शासन स्तरावर आंदोलने केल्याने तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेवून उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे मध्यवर्ती पोलीस ठाणे, उल्हासनगर-३ येथे प्रकाश मुळे व इतर ४ यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. यांच्याविरुध्द अनेक तक्रारी केल्या असल्याने संचालक, नगर रचना विभाग व शासन स्तरावरून प्रकाश मुळे यांच्याबाबत वारंवार विचारणा होत असते. मुळे यांनी मंजुरी दिलेल्या प्रकरणांची सहाय्यक संचालकामार्फत फेर तपासणी सुरू असताना त्यांच्याकडून हस्तक्षेप होवू नये व कागदपत्रांची हेराफेरी होवू नये, यासाठी त्यांना कार्यमुक्त करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. मनपा आयुक्त अजीज शेख यांनी वरील आदेशाची माहिती राज्य सरकार आणि कोकण भवन यांना दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in