

उल्हासनगर : एक धोकादायक इमारत पाडताना दुसऱ्या इमारतीतील रहिवाशांच्या जीवितालाच धोका निर्माण झाल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरात घडला आहे. कॅम्प क्रमांक चारमधील मनमंदिर इमारतीच्या पाडकामादरम्यान बांधकामाचा मोठा भाग शेजारील दक्ष अपार्टमेंटवर कोसळल्याने घरांचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पाडकामातील निष्काळजीपणा आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार मधील ओटी चौक परिसरात धोकादायक इमारतीच्या पाडकामादरम्यान झालेल्या गंभीर प्रकारामुळे शेजारील इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बुधवारी (दि.११) दुपारच्या सुमारास १४ नंबर शाळेजवळील मनमंदिर या धोकादायक इमारतीचे पाडकाम सुरू असताना तिच्या बांधकामाचा मोठा भाग अचानक शेजारील दक्ष अपार्टमेंटवर कोसळला. या घटनेत अपार्टमेंटमधील काही घरांच्या भिंतींना तडे गेले, तर सिमेंट-काँक्रीटचा ढिगारा थेट घरांमध्ये शिरल्याने घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाच वर्षांची चिमुरडी थोडक्यात बचावली!
दक्ष अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील घरात पाच वर्षांची चिमुरडी गाढ झोपेत असतानाच शेजारील इमारतीचा मोठा भाग अचानक कोसळला. सिमेंट-काँक्रीटचा ढिगारा घरात शिरल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. मात्र, दैव बलवत्तर म्हणून चिमुरडी थोडक्यात बचावली. या थरारक घटनेने रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला असून पाडकामातील निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त होत आहे.
धोकादायक इमारतीचे पाडकाम करताना शेजारील इमारतींच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का, असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. एका इमारतीचा धोका दूर करताना दुसऱ्या इमारतीतील नागरिकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण झाल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून निष्काळजीपणास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, तसेच नुकसानग्रस्त रहिवाशांना योग्य भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.