
उल्हासनगर : गुन्हेगारी जगतात खळबळ उडवणाऱ्या डी कंपनीशी संबंधित ३७ वर्षांपूर्वीच्या खुनाच्या प्रयत्नात गुंतलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या फरारी गुन्हेगाराला अखेर मुंबई पोलिसांनी रायगड जिल्ह्याच्या अडगळीतील डोंगरातून शोधून काढत ताब्यात घेतले आहे. या अटकेने एकेकाळी मुंबईतील दहशत ठरलेल्या गुन्ह्याची पाने पुन्हा उघडली असून, पोलिसांच्या धाडसी आणि अतिशय जोखमीच्या मोहिमेचे हे दखलपात्र यश ठरले आहे.
२८ नोव्हेंबर १९८८ रोजी, मुंबईच्या युनिव्हर्सिटी पथावरील ग्रीन्डलेन्स बँकेजवळ, उल्हासनगर शहरातील तत्कालीन आग्रीसेना अध्यक्ष गोपाळ रजवानी यांच्यावर त्यांच्या गाडीचालक हरेश कमलदास केशवानी (२३) याच्या समोरच गोळीबार करण्यात आला होता. पिस्तुलधारी हल्लेखोरांनी संगनमत करून गोपाळ रजवानी यांचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.
या थरारक घटनेत सहभागी असलेल्या आरोपींपैकी एक मंगेश गोविंद मोरे उर्फ मंगेश मांजरेकर हा न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित न राहता पोलिसांना वारंवार गुंगारा देत अनेक वर्ष फरार होता. त्याच्या विरोधात सत्र न्यायालयाने स्थायी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
तडीपार पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रामप्रसाद चंदवाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त बातमीदार सक्रिय करत आरोपीचा ठावठिकाणा मिळवला. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील नानेमाची-वाकी-बुद्रुक या दुर्गम डोंगराळ भागात जाऊन पोलिसांनी सापळा रचत आरोपीला अटक केली.