उल्हासनगर : दिवाळीच्या खरेदीला पार्किंगचे ग्रहण; ग्राहक हैराण, बाजारपेठांत तुफान गर्दी

दिवाळीच्या खरेदीने उल्हासनगरमधील बाजारपेठा गजबजल्या असल्या, तरी पार्किंगच्या गंभीर समस्येमुळे ग्राहकांच्या आनंदावर विरजण पडत आहे.
उल्हासनगर : दिवाळीच्या खरेदीला पार्किंगचे ग्रहण; ग्राहक हैराण, बाजारपेठांत तुफान गर्दी
उल्हासनगर : दिवाळीच्या खरेदीला पार्किंगचे ग्रहण; ग्राहक हैराण, बाजारपेठांत तुफान गर्दी
Published on: 

उल्हासनगर : दिवाळीच्या खरेदीने उल्हासनगरमधील बाजारपेठा गजबजल्या असल्या, तरी पार्किंगच्या गंभीर समस्येमुळे ग्राहकांच्या आनंदावर विरजण पडत आहे. खरेदीसाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या ग्राहकांना वाहने उभी करण्यासाठी जागा शोधताना कसरत करावी लागत आहे. त्यातच खरेदीचे साहित्य घेऊन बाहेर पडताना रिक्षा, ओला आणि उबेरसारखी वाहतूक साधने सहज उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरच्या बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विशेषतः कॅम्प क्रमांक दोन आणि तीनमधील नेहरू चौक, गजानन मार्केट, जपानी बाजार आणि फर्निचर बाजार परिसरात मोठी गर्दी होत आहे. स्वस्त दरात कपडे, फर्निचर, आकाशकंदील आणि दिवाळीच्या सजावटीचे साहित्य मिळत असल्याने या बाजारपेठांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.

मात्र, बाजारपेठांचा परिसर दाटीवाटीचा असून, पुरेशा वाहनतळांची व्यवस्था नसल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करण्यासाठी ग्राहकांना जागोजागी भटकावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यानंतर साहित्य घेऊन बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना जवळपास रिक्षा मिळविण्यासाठीही प्रतीक्षा करावी लागत आहे. ओला-उबेरसारख्या सेवांची उपलब्धता नसल्याने किंवा वाहन मिळण्यास विलंब होत असल्याने विशेषतः कुटुंबांसह खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे.

दिवाळीच्या काळात बाजारपेठांमधील गर्दी लक्षात घेऊन महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी तात्पुरत्या पार्किंगची व्यवस्था करावी, वाहतुकीचे योग्य नियोजन करावे तसेच ग्राहकांना सहज वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)