उल्हासनगर : उल्हासनगरच्या आशेळेपाडा परिसरात मंगळवारी सायंकाळी जे घडले, त्याने संपूर्ण शहर हादरले. सायंकाळच्या अंधारात अचानक नशेखोरांची टोळी धारदार शस्त्रे घेऊन रस्त्यावर धडकली आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसर रक्ताने माखला गेला. रस्त्यावर चालणारे सामान्य नागरिक, महिला, लहान मुले यांच्या अंगावर चाकू, चॉपर, लोखंडी रॉडसह थेट हल्ले करण्यात आले. काही क्षणांतच तो रस्ता युद्धभूमी बनला.\
कॅम्प ४ मधील या परिसरात ४ ते ५ तरुणांच्या टोळक्याने हल्ला चढवत नागरिकांवर थेट जीवघेणे वार केले. रस्त्यावर उभ्या असलेल्या २५ ते ३० वाहनांचीही बेछूट तोडफोड करण्यात आली. अचानक झालेल्या या हिंसाचारामुळे परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण पसरले.
या हल्ल्यात बचावलेल्या नागरिकांनी आपल्या अनुभवातून त्या भीषण क्षणांची साक्ष दिली. मी माझ्या दोन लहान मुलांना घेऊन चालले होते. एका नशेखोराने रॉड आमच्यावर फेकला, मी मुलांना पोटाशी धरून वाकले… त्या क्षणी वाटलं की आता वाचणार नाही, असे थरथरत्या शब्दात एका महिलेने सांगितले.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला होता. सीसीटीव्ही फूटेजमधून आरोपींची ओळख पटली असून ओम उर्फ पन्नी जगदाळे, साहिल म्हात्रे, सुमीत उर्फ लाल कदम, साहिल उर्फ सार्थक अहिरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मी आणि माझा मुलगा घरी जात असतांना या टोळक्याने काही कारण नसताना आमची गाडी अडवली आणि माझ्या मुलावर धारदार शास्त्राने बेछूट हल्ला करायला सुरवात केली. मी माझ्या मुलाला वाचवण्यासाठी पुढे आली असता त्यांनी माझ्यावर देखील चाकूने सपासप वार केले.
- कुसुम मोरे
संध्याकाळी अचानक चार ते पाच जणांचे टोळके पाण्याच्या टाकीकडून यशवंत विद्यालयापर्यंत आले आणि त्यांनी रस्त्यातील बऱ्याच चार चाकी, रिक्षा आणि दुचाकी फोडल्या. यात माझ्या रिक्षाचे देखील नुकसान झाले.
- प्रथमेश भोसले
मी माझ्या आईला कामावरून घरी आणत असतांना या टोळक्याने अचानक आमच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात मी आणि माझी आई दोघे गंभीर जमखी झालो.
- सचिन मोरे