उल्हासनगरात दिवसाढवळ्या नशेखोरांची दहशत! बंजारा कॉलनीत तलवारी-चॉपरने नागरिकांवर हल्ला, तीन जण गंभीर

उल्हासनगरात नशेच्या धुंदीत बेशिस्तपणाचे थैमान सोमवारी सकाळपासून पाहायला मिळाले. तलवारी, चॉपर आणि चाकूंनी सज्ज झालेल्या गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांच्या टोळक्याने भर रस्त्यावर रक्ताचा खेळ मांडला.
उल्हासनगरात दिवसाढवळ्या नशेखोरांची दहशत!   बंजारा कॉलनीत तलवारी-चॉपरने नागरिकांवर हल्ला, तीन जण गंभीर
Published on

उल्हासनगर : उल्हासनगरात नशेच्या धुंदीत बेशिस्तपणाचे थैमान सोमवारी सकाळपासून पाहायला मिळाले. तलवारी, चॉपर आणि चाकूंनी सज्ज झालेल्या गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांच्या टोळक्याने भर रस्त्यावर रक्ताचा खेळ मांडला. महिलांपासून सामान्य नागरिकांपर्यंत कोणालाही न बघता धारदार शस्त्राने हल्ले करत या टोळक्याने परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण केलं. या प्रकारामुळे ‘पोलिस कुठं आहेत?’ हा प्रश्न या प्रकाराने गर्भगळित झालेल्या प्रत्येकाच्या ओठांवर आहे.

उल्हासनगर कॅम्प ४ मधील बंजारा कॉलनीत सोमवारी सकाळी घडलेली एक धक्कादायक घटना सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. काही नशेखोर तरुणांनी तलवारी, चॉपर आणि चाकूंसह रस्त्यावर उतरत अक्षरशः आतंक माजवला. या हल्ल्यांत तिघे गंभीर जखमी झाले असून महिलांवर हल्ल्याचा प्रयत्न, घरांवर दगडफेक आणि पाळीव प्राण्यांवर देखील अमानुष हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी सुमारे ६ वाजता नरेश श्रीवास्तव हे भाजीपाला घेण्यासाठी घराबाहेर पडले असताना या नशेत असलेल्या गुन्हेगारी वृत्तीच्या टोळक्याने त्यांच्यावर अचानक धारदार शस्त्रांनी हल्ला केला. नरेश यांच्या डोक्यावर आणि हातावर घाव घालण्यात आले असून ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

नंतर थोड्या वेळाने याच टोळक्याने रघुनाथनगर बंजारा कॉलनी परिसरात राफा कुटुंबाच्या घराबाहेर येत त्यांच्या पाळीव कुत्र्यावर क्रूरपणे हल्ला केला. हे पाहून अश्विनी राफा यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या दिशेनेही शस्त्र उगारण्यात आले. अश्विनी यांचा भाऊ आणि शेजारी त्यांना वाचवायला धावून आले, परंतु या तरुणांनी त्यांच्यावरही तलवारी, चाकू आणि चॉपरने हल्ला केला. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी राफा यांच्या घरावरही चाकू, चॉपर आणि तलवारीने तुफान हल्ला चढवला. घराचे दरवाजे फोडण्याचा प्रयत्न, दगडफेक करून घराचे मोठं नुकसान केले, आणि परिसरात शिवीगाळ करत घाबरवणे हे सारे काही अवघ्या काही मिनिटांत घडले.

१०० आणि ११२ वर फोन करूनही मदत नाही...

नागरिकांनी घटना घडल्यानंतर तातडीने पोलिसांची मदत मागण्यासाठी १०० आणि ११२ या आपत्कालीन क्रमांकावर अनेक वेळा कॉल केले. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या क्रमांकावरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही असा आरोप राफा कुटूंबीयाने केला आहे. तोपर्यंत आरोपींनी हल्ले करून पळ काढला होता. आपत्कालीन सेवेतील या दुर्लक्षामुळे संतप्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘पोलिस मदतीला वेळेवर पोहोचत नसतील, तर अशा सेवा कोणासाठी?’ असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in