Ulhasnagar : पाण्याच्या विळख्यात अडकलेल्या आजीबाईंची अग्निशमन दलाकडून सुटका

उल्हासनगरमध्ये मुसळधार पावसाने निर्माण केलेल्या जलसंकटात माणुसकीचा हृदयस्पर्शी क्षण पाहायला मिळाला. जिजामाता परिसरातील पाण्याने वेढलेल्या घरात अनेक तास अडकून पडलेल्या ८० वर्षीय वृद्ध आजीबाईंची उल्हासनगर अग्निशमन दलाने जीवाची पर्वा न करता सुखरूप सुटका केली.
Ulhasnagar : पाण्याच्या विळख्यात अडकलेल्या आजीबाईंची अग्निशमन दलाकडून सुटका
Published on

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये मुसळधार पावसाने निर्माण केलेल्या जलसंकटात माणुसकीचा हृदयस्पर्शी क्षण पाहायला मिळाला. जिजामाता परिसरातील पाण्याने वेढलेल्या घरात अनेक तास अडकून पडलेल्या ८० वर्षीय वृद्ध आजीबाईंची उल्हासनगर अग्निशमन दलाने जीवाची पर्वा न करता सुखरूप सुटका केली. अग्निशमन जवानांनी कंबरेपर्यंतच्या पाण्यातून आजीबाईंना उचलून सुरक्षितस्थळी पोहोचवत आपले कर्तव्य आणि संवेदनशीलता पुन्हा एकदा सिद्ध केली.

उल्हासनगर शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कॅम्प-४ मधील जिजामाता परिसरात शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा फटका बसला. याच परिसरातील एका घरात एक वृद्ध आजीबाई अनेक तास पाण्यात अडकून पडल्या होत्या. परिसरातील नागरिकांनी याची माहिती उल्हासनगर अग्निशमन दलाला दिल्यानंतर जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

घराभोवती साचलेल्या चार फुटांहून अधिक पाण्यातून मार्ग काढत अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आजीबाईंना काळजीपूर्वक उचलून बाहेर काढले आणि सुरक्षितस्थळी हलविले. या धाडसी आणि तत्पर बचावकार्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. प्रतिकूल परिस्थितीतही दाखविलेल्या धैर्य, संवेदनशीलता आणि सेवाभावामुळे अग्निशमन दलाच्या जवानांवर नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in