
उल्हासनगर : शहरातील एक नामांकित ‘ट्रॅव्हल एजंट’ असल्याचा मुखवटा धारण करून उल्हासनगरातील अरुण पोपटानी नावाचा इसम दिल्ली आणि हरयाणातून उच्च प्रतीची स्कॉच, विदेशी मद्य बेकायदेशीरपणे आयात करत होता आणि ती उल्हासनगर व आजूबाजूच्या परिसरातील हायप्रोफाईल सोसायट्यांमध्ये विक्री करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना कल्याण सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्र. २ यांनी उल्हासनगर, अंबरनाथ आणि मधुबन चौक या ठिकाणी साखळी छापे टाकून १८.६३ लाखांचा स्कॉच साठा आणि दोन वाहने जप्त केली होती. या कारवाईत तिकीट एजंट अरुण पोपटानी, तसेच त्याचे दोन साथीदार सुरज शुक्ला आणि दिपक नंनकानी यांना अटक करण्यात आली होती. आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार विदेशी दारूची साठवणूक आणि विक्री संगणकीय बुकिंग व्यवहाराच्या आड लपवली जात होती.
कल्याण सत्र न्यायालयाने तीनही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याची कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, तसेच अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निरीक्षक दीपक परब यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा हा छापा केवळ उल्हासनगरापुरता मर्यादित न राहता परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्य तस्करीवर रोख बसवणारा ठरणार आहे. या प्रकरणाचा तपास अधिक खोलात सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी नावे आणि साठे समोर येण्याची शक्यता आहे.
हॉटेल्स, खासगी पार्ट्यांमध्ये वितरण
तपास यंत्रणांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी परराज्यातून मोठ्या प्रमाणात विदेशी स्कॉच विविध पॅकेजिंगमध्ये उल्हासनगरात आणत होते. त्यानंतर ती दारू मोठ्या हॉटेल्स, बंगल्यांमधील खासगी पार्ट्यांसाठी तसेच उच्चभ्रू ग्राहकांना गुप्तपणे वितरित केली जात होती. यात आणखी काही एजंट्स आणि संपर्क सूत्रांचा समावेश असल्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात येत आहे.