

उल्हासनगर : ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली जयपूरमधील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या (जीएसआय) निवृत्त अधिकाऱ्याची २ कोटी १२ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजस्थान सायबर पोलिसांनी उल्हासनगरातील जिम ट्रेनर रवींद्र जितेंद्र प्रसाद सिंह ऊर्फ अक्षय सिंह तथा देवा याला अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
९ ते १८ ऑगस्टदरम्यान सायबर गुन्हेगारांनी पोलीस आणि सरकारी अधिकारी असल्याचे भासवून संबंधित अधिकाऱ्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. बनावट अटक वॉरंट पाठवून त्याला व्हिडीओ कॉलवर राहण्यास भाग पाडले. अटकेच्या भीतीने अधिकाऱ्याने दोन बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित केले.
राजस्थानचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही. के. सिंह यांच्या माहितीनुसार, रवींद्रची टेलिग्रामवरील ‘BRO PAY’ चॅनेलच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांशी ओळख झाली होती. आर्थिक मोबदल्याच्या आमिषाने त्याने उल्हासनगरातील कमल रेसिडेन्सी हॉटेलमध्ये अन्य आरोपी रोहित कटकधोंड याच्या राहण्याची व्यवस्था केल्याचा आरोप आहे.
तसेच बनावट नावाने सिमकार्ड वापरून बँक खात्यांची कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची माहिती साथीदारांना पुरवल्याचाही आरोप आहे. त्याला मोबदल्यात मोबाइल आणि २० हजार रुपये मिळाल्याचे तपासात समोर आले आहे. राजस्थान पोलीस पुढील तपास करत आहेत.