Ulhasnagar : लटकत्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका! दुर्घटनेनंतरच महापालिकेला जाग येणार का?

चार मजली इमारतीचा मोठा भाग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर आता उर्वरित इमारतीचे धोकादायक भाग लटकत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Ulhasnagar : लटकत्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका! दुर्घटनेनंतरच महापालिकेला जाग येणार का?
Published on: 

उल्हासनगर : चार मजली इमारतीचा मोठा भाग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर आता उर्वरित इमारतीचे धोकादायक भाग लटकत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाडकाम अर्धवट सोडल्याने परिसरात दुर्घटनेची भीती निर्माण झाली आहे.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोनमधील सिरू चौकाजवळील बाबा बेफिक्र चौक परिसरात टिल्लूमल या चार मजली इमारतीचे पाडकाम सुरू आहे. शुक्रवारी पाडकामादरम्यान इमारतीचा मोठा भाग कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. शनिवारी समोर आलेल्या छायाचित्रांत इमारतीचे काही भाग धोकादायक अवस्थेत लटकत असल्याचे दिसून आले. उर्वरित पाडकाम बंद असल्याचे दिसत असून, केवळ हिरवे कापड बांधण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

हा परिसर दाट लोकवस्तीचा असून, बाजारपेठेमुळे रस्त्यावर नागरिकांची सतत वर्दळ असते. अशा स्थितीत लटकणारा भाग कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मजबूत बॅरिकेडिंग, वाहतुकीचे नियमन आणि धोकादायक अवशेष सुरक्षितपणे हटविणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in