उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये एकाच घराला अवघ्या काही तासांच्या अंतराने दोनदा आग लागल्याची घटना सोमवारी (दि.१९) घडली. या वेळी घरात उपस्थित असलेल्या वृद्ध महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, एकाच घरात वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५ मधील सेक्शन ३९ परिसरात, बॅरेक क्रमांक १८५५ समोरील एका घराला सोमवारी सायंकाळी आणि मध्यरात्री आग लागली. आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले.
आग लागली तेव्हा घरात एक वृद्ध महिला होती. दरम्यान, याच घरात यापूर्वीही अनेकदा किरकोळ आगी लागल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. एकाच घरात वारंवार आग लागण्यामागे विद्युत यंत्रणेतील बिघाड आहे की अन्य काही कारण, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या घटनांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.